राज्यात ३३१ वाघ, ६६९ बिबट; भारतीय वन्यजीव संस्थानकडून अहवाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:03 PM2020-11-28T12:03:53+5:302020-11-28T12:04:13+5:30
Amravati News Tiger राज्यात ३३१ वाघ आणि ६६९ बिबट असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात ३३१ वाघ आणि ६६९ बिबट असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेकडून जाहीर करण्यात आला आहे. सन २०२० च्या या अहवालात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आणि १३१ बिबट असल्याचे म्हटले आहे.
कॅमेरा ट्रॅप व ट्रान्सेक्ट लाईन पद्धतीने महाराष्ट्रातील वाघांसह वन्यजीवांचे मॉनिटरींग केल्या गेले. यात वनविभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तरीत्या फेज चार अंतर्गत वाघ आणि बिबट्यांचीही संख्या मिळविली आहे.
यात पेंच व्याघ्र अभयारण्यात ३९ वाघ, ६३ बिबट, नवेगाव नागझिरा व्याघ्र अभयारण्यात ९ वाघ, १६२ बिबट, ताडोबा अंधेरी अभयारण्यात ८५ वाघ, १०९ बिबट, बोर अभयारण्यात ६ वाघ, ३० बिबट, ब्रम्हपुरी फॉरेस्ट डिव्हीजनमध्ये ५३ वाघ, ८८ बिबट, टिपेश्वर अभयारण्यात ११ वाघ, ६ बिबट आणि सेंट्रल चांदा फॉरेस्ट डिव्हीजनमध्ये २३ वाघ आहेत. सेंट्रल चांदा फॉरेस्ट आणि चंद्रपूर फॉरेस्ट डिव्हीजन व पैनगंगामध्ये बिबट आढळून आलेले नाहीत.
चंद्रपूर फॉरेस्ट डिव्हीजनमध्ये ३१ आणि पैनगंगामध्ये १ वाघ नोंदविले गेले. शिरपूर तालुका पुणे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकाही वाघाची नोंद नाही. मात्र २२ बिबट शिरपूरमध्ये तर ४७ बिबट संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये दाखवण्यात आले आहेत.
भारतीय वन्यजीव संस्थेकडून प्रकाशित अहवालातील आकडेवारीवरून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढतीवर असून वाघांसह बिबट व अन्य वन्यजीव स्थिरावल्याचे स्पष्ट होते.