महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे ३३,१६६ अर्ज प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:04+5:302021-03-25T04:14:04+5:30
अमरावती : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हिजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि अनुसूचित जाती ...
अमरावती : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हिजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी अमरावती जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमांच्या ११८ महाविद्यालयांमध्ये एकूण ३३,१६६ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रखडले आहेत. मार्च एन्डिंग सहा दिवस येऊनदेखील अद्याप ६०.१७ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे दाखल झालेले नाहीत.
कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक अभ्यासक्रमांसह व्यवस्थापन फार्मसी, तंत्रनिकेतन, कलानिकेतन आदी विविध महाविद्यालयातील ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी व एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. गतवर्षी जिल्ह्यातील ८७,२६० विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली होती. मात्र, यंदा आतापर्यंत ६३,८१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ७३.१३ टक्के आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज छाननी करून महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन प्रणालीतून पाठविण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. या शिष्यवृत्तीबाबत समाजकल्याण विभागाच्या अमरावती प्रादेशिक उपायुक्तांनी नाराजी व्यक्त केली. या शिष्यवृत्तीच्या वितरणासाठी शासनाने ३१ मार्च डेडलाईन दिली आहे.
---------------------
जिल्ह्यातील महाविद्यालये : ११८
महाविद्यालयात एकूण प्रलंबित अर्ज : ३३१६६
प्रवर्गनिहाय प्रलंबित अर्जाची संख्या :
अनुसूचित जाती प्रवर्ग: ९५९५
ओबीसी : १४२२० व्हिजेएनटी: ११९०२ एसबीसी : ७४४९
----------------
महाविद्यालयांना शुकवारची डेडलाईन
अमरावती जिल्ह्यातील १९९५७ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालयाने मंजूर केले आहेत. अद्याप ३३,१६६ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज शुक्रवार, २६ मार्चपर्यंत ऑनलाईन प्रणालीतून समाजकल्याण कार्यालयांकडे वर्ग करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय सावळे यांनी केले आहे.