पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१७ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:48 AM2019-01-25T11:48:30+5:302019-01-25T11:50:54+5:30
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाला ठोस नियोजन करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील एकमेव असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पांत फक्त २६.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा जलसंपदा विभागाचे अभियंते करीत असले तरी, सिंचनासाठी आता पाणी देता येणार नाही. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पांची स्थिती इतर प्रकल्पांच्या तुलनेत चांगली आहे. मात्र, या प्रकल्पांत आता ६९ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात ४६.५९ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ३३.३७ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४९.८३ टक्के पाणी शिल्लक आहे, तर वानमध्ये ७०.४८ टक्के पाणी आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. नळगंगा प्रकल्पात १२.७४ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ६.१५ टक्के पाणीसाठा आहे. खळकपूर्णा प्रकल्पाचे कामे अपूर्ण असल्याने या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद आहे. बुलडाणा जिल्ह्यावर सिंचनाचे संकट तर आलेच आहे. मात्र, उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.
२४ मध्यम प्रकल्पांत ४६.२४ टक्के पाणीसाठा
पश्चिम विदर्भातील २४ मध्यम प्रकल्पांत ४६.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४६९ लघु प्रकल्पांत २९.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ३४.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.