दोन दिवस धावल्या ३४ बसेस अन उत्पन्न ३.३७ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:50+5:302021-04-15T04:12:50+5:30
कोरोना वीकेंड लॉकडाऊन; एसटी महामंडळावर आर्थिक संकट अमरावती : कोरोना वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या बंदमुळे एसटी महामंडळाला ...
कोरोना वीकेंड लॉकडाऊन; एसटी महामंडळावर आर्थिक संकट
अमरावती : कोरोना वीकेंड लॉकडाऊनच्या दोन दिवसांच्या बंदमुळे एसटी महामंडळाला केवळ ३ लाख ३७ हजार रुपयांचेच उत्पन्न मिळाले असून, ७ लाख २४ हजार ९२० रुपयांचा आर्थिक फटका अमरावती मध्यवर्ती आगाराला बसला आहे.
जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बंद पुकारला जात असल्याने त्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या बसेसवर होत आहे. जिल्ह्यात महामंडळाचे आठ आगार आहेत. त्यातून शेकडो बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाहून जिल्ह्यांतर्गत तसेच लांबपल्ल्याच्या बसेस सोडल्या जातात. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शासनाने निर्बंध लावले आहेत. शनिवार, रविवारी शासनाने वीकेंड लॉकडाऊन घोषित केल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. शिवाय रस्ते ओस पडत आहेत. आठवडी बाजार केव्हाच बंद करण्यात आले. त्यामुळे साहजीकच बाजारपेठेवर परिणाम झाला असून महामंडळात देखील प्रवासीसंख्या घटली आहे.
दोन दिवसात लाखोचे नुकसान
अमरावती मध्यवर्ती आगारातून पुणे, औरंगाबाद, परभणी, जळगाव, मांडवी, हिंगोली यासारख्या मोठ्या शहरांत बसेस धावतात. गत जानेवारीपासून महामंडळाच्या बसेस रुळावर येत असतानाच जानेवारीपासून पुन्हा कोरोनाची संख्या वाढल्याने अमरावती आगारातून धावणाऱ्या बसेसची संख्या कमी झाली आहे. दररोज ५० ते ५५ हजार किलोमीटर जाणाऱ्या बसचे अवघ्या ८,७०० किलोमीटरपर्यंत येऊन थांबल्या आहेत. शनिवारपेक्षाही रविवारी सर्वाधिक परिणाम झाल्याचे जाणवले. रविवारी केवळ ७ ते ८ हजार किलोमीटरचा बसेस धावल्या प्रवासी नसल्यामुळे झालेला परिणाम लॉकडाऊनच्या शक्यतेने अजूनही कमी झालेला आहे.
अवघ्या ३० ते ३५ गाड्या
मागील वर्षीच्या परिस्थितीतून सावरत अमरावतीतून किमान २०० बसफेऱ्या सुरू होत्या. जानेवारी चांगले उत्पन्न मिळाले. आता पुन्हा कोरोनाचा फटका बसला. इतर वेळी ४० ते ४५ बसेस धावत आहेत. शनिवार-रविवारी ३० ते ३४ बसेसच धावल्याने उत्पन्नात घट झाली.
सर्वच आगारांना वीकेंडचा फटका
अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, चांदुर रेल्वे, मोर्शी, वरूड, परतवाडा, दयार्पूर, चांदूर बाजार या एसटी आगाराच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट झाली आहे. कोरोनामुळे नियमित गाड्या बंद करण्याची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांना देखील काम नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकांपैकीच एक आहे. यावरून जिल्ह्यातील आगाराची परिस्थिती समोर येते.
कोट
विभागात महामंडळाला दोन दिवसांत मोठे नुकसान सहन करावे लागले. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या सोडण्यात आल्या. सोमवारपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यास शासनाच्या निदेर्शानुसार निर्णय घेतला जाईल.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक
बॉक्स
मध्यवर्ती आगारातील एकूण बसेसची संख्या - ५८
दोन दिवसांत धावलेल्या बसेस - ३४
फेऱ्या झाल्या आगारामध्ये - १३८
दोन दिवसात मिळाले उत्पन्न - ३.३७