तालुक्यातील ३४ सहकारी संस्था अवसायनात

By Admin | Published: November 25, 2015 12:46 AM2015-11-25T00:46:08+5:302015-11-25T00:46:08+5:30

तालुक्यात एकूण १५९ संस्था अस्तित्वात होत्या. त्यापैकी ३४ अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

In the 34 co-operative societies of the taluka | तालुक्यातील ३४ सहकारी संस्था अवसायनात

तालुक्यातील ३४ सहकारी संस्था अवसायनात

googlenewsNext

आदेशानुसार झाले सर्वेक्षण : एकाही संस्थेने मांडले नाही मत, शेकडो ग्राहकांवर कुऱ्हाड
अंजनगाव सुर्जी : तालुक्यात एकूण १५९ संस्था अस्तित्वात होत्या. त्यापैकी ३४ अवसायनात काढण्यात आल्या आहेत. या संस्था अवसायनात काढल्याचा १ आॅक्टोबर २०१५ चा आदेश अंतरिम होता. सर्व संस्थांना कायदेशीररीत्या नोटीस पाठवून कळविण्यात आले व त्यांचे काही म्हणणे आहे काय, याबाबत विचारणा करण्यात आली. पण एकाही संस्थेने या हाकेला ओ दिला नाही. म्हणून हा आदेश आता मुदत गेल्यानंतर अंतिम समजला जाईल, असे सहायक निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या संस्था कागदोपत्री सुरू होत्या, मात्र प्रत्यक्षात बंदावस्थेत होत्या, तर काही संस्थांना ठावठिकाणा नव्हता. सर्वेक्षणात संस्थेच्या उपविधीच्या संस्थेच्या मूळ पत्त्यावर संस्था आढळून आल्या नाहीत. बंद करण्यात आलेल्या संस्थांमध्ये बेरोजगार संस्था, गृहनिर्माण संस्था, पाणीवापर संस्था, ग्राहक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे.
संस्थेच्या नियमावलीनुसार, मासिक सभा न घेणे, खात रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, सभेला उपस्थित न राहणे, वरिष्ठ कार्यालयाला अहवाल न पाठविणे अशा विविध गंभीर त्रुट्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आल्यात. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने सर्वेक्षणाचा परिपूर्ण अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अमरावती यांना पाठविला. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी सदर अहवाल आयुक्त पुणे यांना पाठविला.
यामध्ये स्वीपर्स हाऊसिंग सोसायटी, अंबा गृहनिर्माण संस्था, तांत्रिक बहुउद्देशीय नागरी सेवा संस्था, सम्यक मागासवर्गीय नागरी सेवा संस्था, बेरोजगार मातृछाया नागरी सेवा संस्था, इंदिरा महिला औद्योगिक संस्था, नागवेली बेरोजगार सेवा संस्था, ताज्जोद्दीन बाबा कामगार संस्था, मॉ जिजाऊ गृहनिर्माण संस्था, घरकूल प्राथमिक ग्राहक भांडार, कच्चे चामडे व हड्डी औद्योगिक संस्था या सर्व अंजनगाव सुर्जी येथील सहकारी संस्था आता कायम अवसायनात निघाल्या आहेत. ग्रामीण भागातील अभिजित नागरी सेवा संस्था व शिवकृपा महिला औद्योगिक संस्था कसबेगव्हाण, आत्माराम पाटील विद्यालय ग्राहक भांडार व चिंतामणी महिला नागरी सेवा संस्था, गावंडगाव, पांढरी सहकारी पाणीवापर संस्था, सीतामाता सहकारी पाणीवापर संस्था, तुरखेड, बोराळा पाणीवापर सहकारी संस्था, अन्नाभाऊ साठे बुरड कामगार संस्था व वसंतराव नाईक मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, मुऱ्हा, दादासाहेब रुपवते मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, विहीगाव, राहुल मागासवर्गी गृहनिर्माण संस्था व मिलिंद मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, वनोजा, संतकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था, सातेगाव, संघप्रिय महिला औद्योगिक संस्था, पांढरी, धाडेश्वर पाणीवापर संस्था, धाडी, ग्रामसेवता पाणी वापर संस्था, देवगाव, अशोकनगर गृहनिर्माण संस्था, सातेगाव, प्रज्ञा मागासवर्गीय संस्था व जयपुरीबाबा पीक संरक्षक संस्था निमखेड बाजार, देवेश्वरी पाणी वापर संस्था तुरखेड, महात्मा ज्योतिबा फुले पाणीवापर संस्था, देवगाव इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

अन् अध्यक्षांनी केले पलायन
अवसायनात निघालेल्या काही संस्थांचे चालक सहजासहजी निबंधक कार्यालयाची नोटीस घेत नव्हते म्हणून त्यांना, तुमच्या संस्थेला घरकूल मंजूर झाल्याचे तोंडी सांगण्यात आले. त्यावेळी मात्र एका संस्थेचे तीन-तीन अध्यक्ष तयार झाले. मीच अध्यक्ष आहे हा दावा करण्यात आला. पण ही नोटीस आपली संस्था खारीज करण्याची आहे, ही वस्तुस्थिती समजल्यावर सर्वांनी पलायन केले.

भागधारकांचे पैसे कुठे गेले?
३४ संस्था कायम अवसायनात निघाल्या. ही वस्तुस्थिती असली तरी या सर्व संस्था चालकांनी शेअर्सच्या माध्यमातून भागधारकांकडून किती पैसे गोळा केले व या निधीचे पुढे काय केले? हे पैसे बँकेत ठेवले की स्वत: वापरले? याची कोणतीही माहिती नाही. याचा उलगडा हे वृत्त सार्वजनिक झाल्यावरच होईल. भागधारकांना या संस्था अवसायनात कायम गेल्याची अजूनही माहिती नाही, हे विशेष!

एकाच उपनिबंधकाची मान्यता
अवसायनात निघालेल्या बहुतांश संस्था एका विशिष्ट उद्देशाने स्थापन झाल्या असून गेल्या काही वर्षांपूर्वी येथे आलेल्या एकाच उपनिबंधकाच्या मान्यतेने स्थापन झाल्या आहेत. ज्या उपनिबंधकाने या अवसायनात गेलेल्या संस्थांना मान्यता दिली. त्या उपनिबंधकाच्या हेतूचीदेखील चौकशी होणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार रोखले जातील व बोगस संस्थांना पायबंद बसेल.

संस्थांवर नेमला जाईल अवसायक
संस्था अंतिमरीत्या अवसायनात गेल्या तरी नैसर्गिक नियमानुसार या सर्वांना जॉर्इंट रजिस्ट्रार अमरावती येथे या आदेशाविरोधात दाद मागता येईल. मात्र अंतिम आदेशानंतर लगेच शासनातर्फे सर्व संस्थांवर अवसायक नेमला जाईल. ज्या संस्थांनी शेअर्स गोळा केले असतील, ज्यांच्याबद्दल तक्रारी असतील, अशा संबंधित संस्थांचे काही देणे-घेणे नसेल ते सर्व व्यवहार उचितरीत्या तपासून त्यानुसार अवसायक कार्यवाही करेल आणि देणे-घेणे नियमित करण्यात येईल, असे अंजनगाव तालुका प्रभारी उपनिबंधक किशोर बलिंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: In the 34 co-operative societies of the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.