अब लौट चले... विदेशी पक्ष्यांना परतीचे वेध
By गणेश वासनिक | Published: March 17, 2023 05:26 PM2023-03-17T17:26:09+5:302023-03-17T17:27:25+5:30
अमरावती जिल्ह्यात ३४ प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांची नोंद, विदर्भात ६७ प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांचे झाले दर्शन
अमरावती : ऋतुचक्र हे निसर्गात होणाऱ्या बदलाचा एक भाग आहे. दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा या बदलाचाच एक भाग आहे. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत अनेक दूरदेशींचे पाहुणे पक्षी आपल्याकडे येतात. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील समुद्रकिनारे, नद्या, तलाव व इतर पाणथळीची ठिकाणे हे खास पाहुणे व्यापून टाकतात, तर काही रान पक्षीही स्थलांतर करून येतात. मात्र, आता विदेशी पक्ष्यांना परतीचे वेध लागले असून, काही पक्ष्यांनी आपली मायभूमी गाठण्यास सुरुवात केली आहे.
यंदा हिवाळी विदेशी पाहुणे म्हणून आलेल्या ६७ प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांची नोंद विदर्भातील जलाशय, नदी, तलावांवर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील नळ दमयंती सागर, केकतपूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा, बासलापूर, भिवापूर, वडाळी व छत्री या जलाशयांवर पक्ष्यांनी हजेरी लावली होती. मेळघाट व पोहरा मालखेड राखीव जंगलातदेखील नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातील निळोना व दारव्हा तालुक्यातील शिंदी अंतरगाव येथील तलाव, तर वाशीम जिल्ह्यातील महान पिंजर, एकबुर्जी तलावात राजहंस, तर गोंदिया, भंडारा व नवेगाव तसेच अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा, यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती, इसापूर व बेंबळा प्रकल्पातील जलाशय तसेच नाशिक व जळगाव भागातही स्थलांतरित पक्ष्यांची नोंद स्थानिक पक्षिमित्रांनी केली आहे.
भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागातून आपल्याकडे पक्षी येतात. काही पक्षी तर २० हजार ते ५४ हजार कि.मी.पर्यंतचा प्रवास करतात. पक्षी हे साधारणतः ताशी ४० ते ६० कि.मी. च्या वेगाने उडतात, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी दिली.
या पक्ष्यांचे झाले दर्शन
यंदा स्थलांतरित पक्षी कांड्या करकोचा, राजहंस, तनई, गजरा, परी, सरग, चिमण शेंद्र्या, लहान रेव टिटवा, पानटिलवा, मोठा पानलावा, कृष्ण ढोक, छोटा टिलवा, जलरंक, तपकिरी डोक्याचा कुरव, शेंडी बदक, कृष्ण थीरथीरा, निलय, राखी डोक्याची लिटकुरी, वरटी पाखरू हे रानपक्षी आदी पक्ष्यांचे दर्शन झाले आहे.
जगण्यासाठी संतुलित वातावरणाच्या शोधार्थ येतात विदेशी पक्षी
पक्षी हे ज्या भागातून स्थलांतर करून येतात, त्या भागात ऋतुनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्यामुळे खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात.
पक्ष्यांचे स्थलांतर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र ही पक्ष्यांची पंढरी आहे, कारण भारताच्या ४३ टक्के पक्षी एकट्या महाराष्ट्रात आढळतात. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या या पक्ष्यांसाठी तलाव व नद्या प्लास्टिकमुक्त ठेवणे आवश्यक आहे. अधिवास जपून संवर्धन व संरक्षण करणे हे वनविभाग व पक्षीमित्रांसमोरील आव्हान आहे.
- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती