३४ सरपंचांवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:16 AM2017-07-24T00:16:41+5:302017-07-24T00:16:41+5:30
केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने ....
विभागीय आयुक्तांचे आदेश : शौचालय बांधकामात सहकार्य नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने तालुक्यातील ३४ सरपंचांवर जि.प. अधिनियम अंतर्गत कारवाई व ग्रामसेवकाचे थेट निलंबन करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिले आहे़
ग्रामस्वच्छता अभियानात घर तिथे शौचालयाला अधिक महत्त्व आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांनी शौचालयासंदर्भात कडक भूमिका घेतली आहे़ गत आठवड्यात विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तालुक्याचा लेखाजोखा घेतला असता केवळ २८ ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के शौचालय पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले.
यंदा दिलेल्या उदिष्टांपैकी आजपर्यंत ५ हजार ८२१ कुटुंबांकडे शौचालये नाहीत, याविषयी पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाने संबंधित ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना व सचिवांना वारंवार पत्र देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र सहकार्य करण्याऐवजी उडवाउडवीचे उत्तर स्थानिक लोकप्रतिनिधीने दिल्यामुळे विभागीय आयुक्ताने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आगामी १ आॅगस्टपर्यंत ज्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रापसदस्य गावात शौचालय बांधण्याकरिता सहकार्य करीत नसेल अशा लोकप्रतिनिधींवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांना पाठविण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे़ दरम्यान सोबत ग्रामसेवकांच्या कामाचा आढावा पाठवून त्यांच्यावर शौचालय उभारणी बाबत काय कारवाई केली याविषयी लेखी अहवाल पाठविण्याचे आदेश बैठकीत दिले आहे़
तालुक्यातील ६ हजार कुटुंबांकडे शौचालय नसून या गावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य गरजेचे आहे़ मात्र कोणतीही मदत ग्रामसेवकांना मिळत नसल्याने १ आॅगस्टनंतर विभागीय आयुक्तांना या गावाचा ग्रामपंचायत अधिनियम ३९ एक याप्रमाणे कारवाईचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे़
- पंकज भोयर, गटविकास अधिकारी, धामणगाव रेल्वे