Amravati | आश्रमशाळेतील ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल
By प्रदीप भाकरे | Published: September 17, 2022 02:39 PM2022-09-17T14:39:55+5:302022-09-17T14:47:18+5:30
शुक्रवारी रात्रीपासून हे विद्यार्थी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आहेत.
अमरावती : परतवाडालगतच्या कारंजा बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील ३४ मुलींना शुक्रवारी सायंकाळी विषबाधा झाली. ही विषबाधा नेमकी कशातून झाली याची अजूनपर्यंत स्पष्टता झालेली नाही.
या बाधित ३४ मुलींना शिक्षकांनी औषधोपचाराकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्रीला दाखल केले.
डॉक्टरांनी यातील ३० मुलींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, एका मुलीला उपचारार्थ अमरावतीला पाठविले. तर चार मुलींना औषधोपचारानंतर लागलीच सुट्टी देण्यात आली.
या सर्व बाधित मुलींना उलटी, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारला सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला. सध्या या सर्व मुलींचे प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान यातील आठ मुलींना शनिवारला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
पंचशील आदिवासी आश्रमशाळेत वर्ग एक ते वर्ग बारा पर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला मुलींनी शुक्रवारला सायंकाळी सोबतच जेवण घेतले. यात मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही. दरम्यान सायंकाळी वर्ग एक ते बारा मधील निवडक अशा ३४ विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला. त्यामुळे नेमकी ही विषबाधा कशातून झाली याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
अतिरिक्त वार्ड सज्ज
औषधोपचार करिता दाखल बाधित मुलींचे एका स्वतंत्र वार्डात व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य तो औषधोपचार तात्काळ मिळावा म्हणून एक अन्य वार्ड अतिरिक्त बेडसह सज्ज ठेवण्यात आला असल्याची माहिती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितले. विषबाधेचे नेमके कारण सध्या सांगता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक रुग्णालयात
पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील बाधित विद्यार्थीनींच्याआरोग्याबाबत शाळेतील शिक्षकही काळजी घेत आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावती जिल्हा रुग्णालयात वस्तीगृह अधीक्षकेसह शाळेतील शिक्षक रुग्णालयात उपस्थित आहेत.