म्हणे, प्रेमाला वयाचे बंधन नाही; ५४ वर्षीय शिक्षिकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 10:39 AM2021-12-08T10:39:21+5:302021-12-08T10:47:51+5:30
एका ५४ वर्षीय विवाहित महिला शिक्षिकेचे ३४ वर्षीय युवकासोबत एक वर्षापूर्वी मैत्री झाली, पुढे प्रेमात रुपांतर झाले. याचा फायदा घेत युवकाने महिलेला पैशांसाठी ब्लॅकमेल करण सुरू केले.
अमरावती : प्रेमाला वयाची बंधने नसतात, असे म्हणतात. अशातच एका ५४ वर्षीय विवाहित महिला शिक्षिकेचे ३४ वर्षीय युवकासोबत एक वर्षापूर्वी मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर लागलीच प्रेमात झाले. फेसबुक आणि व्हाॅट्सअपवर बोलणे चालू झाले. तेव्हापासून प्रेमप्रकरण बहरत राहिले.
दरम्यान, व्यवसाय सुरू करण्याकरिता त्या प्रियकर युवकाने आपल्या या प्रेयसीला पैसे मागितले. तेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला. यावर तिला त्याने धमकावले. पैसे दे नाही, तर व्हाॅट्सॲपवरील मेसेज आणि तुझे सर्व फोटो व्हाट्सअपवर जाहीर करेल. तू जर पैसे दिले नाही, तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. यादरम्यान त्याने शिवीगाळही केली.
तिचा पाठलाग करून तिला त्रास देत जवळीक साधण्याचा त्याने प्रयत्नही केला. यात त्या महिला शिक्षिकेने त्यास समजाविण्याचा प्रयत्नही केला. परतवाड्यापासून जवळच असलेल्या एका खेड्यातील या प्रियकराचा त्रास अधिकच वाढल्यामुळे अखेर त्या महिला शिक्षिकेने परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने परतवाडा पोलिसांनी त्या ३४ वर्षीय युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका प्रकरणात महिला कर्मचाऱ्याची १५ लाखांनी फसवणूक
वयाचे बंधन झुगारणाऱ्या अशाच एका प्रकरणात ३६ वर्षीय महिला कर्मचाऱ्याची १५ लाखांनी फसगत झाली होती. तिचे परतवाड्यातील २९ वर्षीय युवकासोबत प्रेम जुळले. तब्बल तीन वर्षे हे प्रेम चांगलेच बहरले. यातही आधी ओळख, मग प्रेम, प्रेमात लग्नाचे आमिष आणि फसगत व शारीरिक शोषण असाच घटनाक्रम पुढे आला. ही घटना २२ नोव्हेंबरला उजेडात आली. यात महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. राऊत याही प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची घटना उजेडात आली.