३५ उमेदवार, ६९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:20 PM2019-03-19T22:20:50+5:302019-03-19T22:21:15+5:30
लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.
अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ पासून उमेदवारी अर्ज घेण्यास उमेदवारांकडून सुरुवात झाली. सर्वप्रथम अधिवक्ता चंद्रशेखर डोरले यांनी भाजप-शिवसेना युतीच्या नावे आनंदराव अडसूळ यांच्याकरिता चार अर्ज, तर युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्याकरिता कमलताई गवई यांनी चार अर्जाची उचल केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नावे राजू कोंडे व पंकज मेश्राम यांनी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नावे आनंद धवने व राहुल मोहोड, रिपब्लिकन सोशल मुव्हमेंटच्या नावे महेश तायडे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या नावे प्रमोद खडसे, बहुजन समाज पार्टीच्या नावे बापू बोते, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया डेमोकॅ्रटिकच्या नावे राहुल देशमुख, भारिप-बहुजन महासंघच्या नावे दिलीप वासनिक यांनी गुणवंत देवपारे यांच्याकरिता अर्जाची उचल केली. भारतीय दलित आदिवासी पँथर सेनेच्या नावे जगदीश इंगळे व मानवी हक्क सुरक्षा दलाच्या नावे डॉ. रेखा रणबावणे व शीला मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज घेतले. २१ अपक्ष उमेदवारांनीदेखील पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जाची उचल केलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर अंतरात उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रवेश तसेच तीन वाहनांना परवानगी, अर्ज उचल व दाखल प्रक्रिया ‘इनकॅमेरा’ असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांना शक्तिप्रदर्शनाचा मोह टाळावा लागणार आहे.
अपक्षाला हवेत १० सूचक
उमेदवारी अर्ज २६ मार्चपर्यंत दाखल करता येणार आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक (प्रस्तावक), तर अन्य राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना १० सूचक लागणार आहे. अर्जाची छाननी २७ मार्च, माघार २९ मार्च, तर १८ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.