देशात दररोज ३५ हेक्टर जंगल कमी होतेय..! वृक्ष लावगडीला खीळ, जंगलाच्या वेदना कोण समजणार
By गणेश वासनिक | Published: March 21, 2023 07:00 AM2023-03-21T07:00:00+5:302023-03-21T07:00:11+5:30
आज जागतिक वन दिन, ३३ टक्के जंगलाचे स्वप्न अधुरे
अमरावती : वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जंगलतोड, औद्योगीकरण, वनजमिनीवर अतिक्रमण, गुरांची अधिक संख्या आणि ‘कुरणक्षेत्र’ची जागा मनुष्य वस्त्यांनी बळकावल्यामुळे वनावर त्याचा ताण वाढला आहे. म्हणूनच जंगलाचे कमी होणारे प्रमाण हा चिंतेचा विषय आहे.
पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी एकूण भूभागाच्या ३३ टक्के वनाचे प्रमाण असणे आवश्यक आहे. भारतात हे प्रमाण २० टक्के असून, प्रतिकूल आहे. जल, जमीन व जंगल यांच नात अतिशय घट्ट आहे. वने आहेत म्हणून नद्यांना पाणी आहे. वने आहेत म्हणून मानवाला प्राणवायू मिळतो. म्हणजेच वनामुळेच मानव प्राणी जीवन जगत आहे. मात्र बेसुमार वृक्षतोडीमुळे देशात दररोज ३५ हेक्टर जंगल कमी होत असल्याचे वास्तव आहे.
भारतात एकूण १४ प्रकारची वने आढळतात. महाराष्ट्रात सात प्रकारची वने आहेत. विदर्भात आर्द्र व शुष्क पानगळी आणि काटेरी खुरटी प्रकारची वने मोठ्या प्रमाणात आढळतात. १८५३ मध्ये ब्रिटीश सत्ता आल्यानंतर बेरार प्रांतात १८६५ मध्ये वन विभागाचे कामकाज सुरू झाले. स्वातंत्र्यानंतर १९६४ पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, अमरावती, बुलढाणा वनवृत असे भाग करण्यात आले. विदर्भातील पेंच, नवेगाव, ताडोबा, मेळघाट, बोर, नागझिराच्या दाट वनात वनसंपदा आढळते, तर अमरावतीनजीक पोहरा मालखेड राखीव जंगल परिसरात खैर, हिवर, पळस, बोर प्रकारचे वृक्ष आढळून येतात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहोळ अभयारण्य तर गावातील कुरण व काटेरी खुरट्या प्रकारात मोडते.
विदर्भातील जंगलात वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, अस्वल, गवा, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट हे प्राणी आहेत. महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्यान, ५३ अभयारण्ये, १८ संवर्धन क्षेत्र असे क्षेत्र संरक्षित आहेत. तसेच ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगडनंतर वनक्षेत्रात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
३३ कोटी वृक्ष लागवडीत ४.६६ टक्के जंगलात वाढ
भाजप-सेना युतीच्या काळात सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात वन विभागासाठी २९४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम वने, वन्यजिवांचे संवर्धन, संरक्षणासाठी तोकडी आहे. सर्वे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार ३३ काेटी वृक्ष लागवडीतून राज्यात ४.६६ टक्के जंगल वाढले आहे.
महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ. कि.मी.
एकूण वनक्षेत्र- ६१,९३९ चौ. कि.मी. आहे. (महाराष्ट्राच्या २०.१३%)
सन २०२३ म्हणजे या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना (थीम) ही ‘वने आणि आरोग्य’ आहे. जंगले आपल्या आरोग्यासाठी खूप काही देतात. ते पाणी शुद्ध करतात, हवा स्वच्छ करतात, वातावरणातील बदलांशी लढण्यासाठी कार्बन मिळवतात, अन्न तसेच जीवनरक्षक औषधे देतात आणि आपले आरोग्य सुधारतात.
- यादव तरटे पाटील, वने, वन्यजीव अभ्यासक