नादुरूस्त एसटी बसचा ३५ प्रवाशांनी अनुभवला थरार
By admin | Published: April 17, 2016 12:09 AM2016-04-17T00:09:46+5:302016-04-17T00:09:46+5:30
रस्त्याने धावताना अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता लाखनवाडी-परतवाडा मार्गावर कविठा गावानजीक घडली.
ब्रेक फेल : एकाच क्रमांकाच्या दोन बसमुळे घोळ
नरेंद्र जावरे परतवाडा
रस्त्याने धावताना अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता लाखनवाडी-परतवाडा मार्गावर कविठा गावानजीक घडली. चालकाच्या ही बाब लक्षात येताच महत्प्रयासाने बस थांबविली आणि अंगावर शहारे आणणारा प्रवाशांचा जिवाचा थरकाप उडविणारा प्रसंग थांबला.
परतवाडा-लाखनवाडीसाठी पहाटे ६ वाजता एम.एच. ०६ एस ८०३९ क्रमांकाची बस फेरीचालक रावेकर व वाहक जयश्री हिवराळे घेऊन गेले. ही बस ७ वाजता कविठा येथे पोहचत असताना अचानक बिघाड होऊन ब्रेक निकामी झाले. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह जवळपास ३५ प्रवासी होते. प्रसंगी एकच हल्लकोळ माजला. मात्र पहाटे रस्त्यावर कुणीच नसल्याने हा आवाज व्यर्थ गेला.
थांबविण्याच्या प्रयत्नात चालक रावेकर यांनी कविठा गावानजीकच्या ‘बदुर्डी’ नदीच्या घाट रस्त्यावर बस आणली आणि वेग नियंत्रित केला. रस्त्यावरील खताच्या पडलेल्या गंजीमुळे अजूनच भर पडली आणि बस थांबली. जिवाचा थरकाप उडविणारा प्रसंग पाहता प्रवाशांनी विना विलंब बसमधून बाहेर निघण्यासाठी एकच गर्दी केली आणि सुटकेचा श्वास टाकला. परतवाडा बस आगारात एमएच ०६ एस ८०३९ क्रमांक आणि एमएच ०६ एन ८०३९ अश्या सारख्या क्रमांकाच्या दोन बसगाड्या आहेत, दोन्हीच्या क्रमांकात एस आणि एन चे अंतर आहे. संबंधित चालकाला ‘एन’ सिरीज असलेली बसगाडी नेण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र सारख्या क्रमांकाने चालकाने ‘एस’ सिरीज असलेली बस नेली. ती बसगाडी नादुरुस्त होती. दुरूस्तीसाठी तिला आगारातील यांत्रिक विभागालगत ठेवण्यात आले होते. मात्र झालेली नजरचूक प्रवाशांच्या जिवावर उठणारी होती.
८० बस ४२ यांत्रिक
जिल्ह्यात सर्वात मोठे आगार परतवाड्याचे आहे. मात्र हे आगर पाच वर्षांपासून ‘भंगार बसचे’ आगार म्हणून ओळखल्या जाते. येथे एकूण ८० बसगाड्या असून दुरुस्तीसाठी केवळ ४२ यांत्रिक कारागीर आहेत. अधिक पदे रिक्त असल्याने नादुरुस्त गाड्यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाही. परिणामी आगारातून दिवसभर ७१ बसफेऱ्या पूर्ण करण्यासाठी नादुरुस्त बसगाड्या नेण्याची वेळ चालकांवर आली आहे. आगार प्रमुख लक्ष्मीनारायण भुतडा सुटीवर आहेत. त्यामुळे हे आगार रामभरोसे आहे.