मेळघाटच्या सीमेवर ३५ पिस्तूल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:06 PM2024-05-02T12:06:29+5:302024-05-02T12:07:02+5:30
Amravati : मध्य प्रदेशातील खकनारजवळ अवैध कारखान्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा (अमरावती) : जपानी बनावटीच्या हुबेहुब पिस्तुली तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपानगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत साडेपाच लाखांच्या ३५ पिस्तुली जप्त केल्या.
सूत्रांनुसार, मंगळवारी १५ पिस्तुली घेऊन जाणाऱ्याला अटक केल्यावर त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे खकनार व नेपानगर पोलिसांनी पिस्तुली बनविण्याच्या साहित्यासह आणखी २० पिस्तुली जप्त केल्या. राजपाल प्रीतम जुनेजा असे १५ पिस्तुलांसह अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या पाचोरी गावातून पिस्तुली खरेदी करून पांढरी फाट्यावर तो उभा होता. त्याला पानगर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी निर्भयसिंह अलावा आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांच्यासमवेत पोलिस पथकाने अटक केली. राजपालने दिलेल्या माहितीवरून पोलिस पथकाने पाचोरी गाठले आणि जवळच्या जंगलातील कारखान्याकडे मोर्चा वळविला. जिल्हा पोलिस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या मार्गदर्शनात कारखान्यावर धाड टाकण्यात आली. २० पिस्तुली, अवजारे, मोबाइल जप्त करण्यात आले. मात्र, आरोपी सुनीलसिंग नानकसिंग सिकलीगर आणि तीरथसिंग सुलतानसिंग सिकलीगर (दोन्ही रा पाचोरी, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हे मोक्यावरून फरार झाले.
खकनार पोलिसांच्या माहितीनुसार, राजपाल हा पाचोरी येथून पिस्तूल खरेदी करून पांढरी गावामार्गे धारणीसाठी निघाला होता. जंगलमार्गे धारणी पोहोचून तो खरगोन जाण्याच्या तयारीत होता. या कारवाईत अमित हनोतिया, शुभम पटेल, शादाब, चालक संदीप, ज्ञानू जैस्वाल, शहाबुद्दीन, सुखलाल, गजेंद्र, अनिल यांनी सहभाग घेतला. यापूर्वी दि. २५ एप्रिल रोजी मोठी कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत ही सर्वांत मोठी खेप आहे, हे विशेष.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता गोपनीय माहितीवरून पिस्तूलासह आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्राच्या धारणी येथे हा साठा जात असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या दोन आरोपींवर पोलिस अधीक्षकांकडून बक्षीस जाहीर करण्यात येत आहे.
- विनय आर्य, ठाणेदार, खकणार