वऱ्हाडातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:12 PM2018-08-02T12:12:16+5:302018-08-02T12:16:49+5:30
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विभागातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विभागातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. बुलडाणा जिल्ह्याची स्थिती गंभीर असूून, भर पावसाळ्यात ४९ टँंकरने ४८ गावांना पाणीपुरवठा होत आहे. विभागातील ४९९ जलप्रकल्पांत केवळ ४० टक्के साठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहीत धरल्यास आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
अमरावती विभागात १ जून ते १ आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाची सरासरी ४२९.५ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३९३ मिमी पाऊस पडला. ही ९१.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेला २८९ मिमी पावसाची नोंद होती. सलग चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने भूजलस्तर मोठ्या प्रमाणावर खालावला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात आज तारखेपर्यंत २८९.४ मिमी पाऊस झाला. ही ९१ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात २९१.९ मिमी पाऊस झाला. ही १२२.८ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३२८.९ मिमी पावासाची नोंद झाली. ही ९६ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३२९ मिमी पाऊस झाला. ही ७२ टक्केवारी आहे, तर वाशिम जिल्ह्यात ३७५ मिमी पाऊस झाला. ही १३० टक्केवारी आहे. विभागात सर्वात कमी पाऊस बुलडाणा जिल्ह्यात झाल्यामुळे अद्यापही ४८ गावांमध्ये ४९ टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.
सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील ११ तालुके, अकोला २, यवतमाळ ९ तर बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ ही तालुके पावसात माघारली आहेत. पावसाचे आता ५९ दिवस बाकी आहेत व हवामानतज्ञांच्या माहितीनुसार आॅगस्टच्या ८ ते १० तारखेपर्यंत अशीच स्थिती कायम राहणार असल्यामुळे आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.
४९९ प्रकल्पांत ४० टक्केच साठा
विभागात एकूण ४९९ जलप्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४०.११ टक्के साठा आहे. त्यातही १० टक्के 'डेडवॉटर' असल्याने प्रत्यक्ष ३० टक्केच साठा असल्याचे वास्तव आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेनटाकळी प्रकल्पात ४.८७ टक्के, नळगंगा १०.१६, ज्ञानगंगा १६.९२, पलढग, १२.५, मन १५.९४, तोरणा ८.३७, तोरणा ८.३७ व उतावली प्रकल्पात १७.२३ टक्के साठा आहे.
५ आॅगस्टपर्यंत पावसाची उघडीप
हवामानतज्ञ अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात ५ आॅगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. ६ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनच्या स्थितीत काही प्रमाणात सुधार येऊ शकतो. हवामानाची सक्रिय स्थिती सध्या उत्तर प्रदेशात कार्यरत आहे, तर मान्सूनचा अक्ष उत्तर भारतात सक्रिय आहे.