कृषी योजनांच्या लाभापासून ३,५०६ शेतकरी राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:28+5:302021-07-10T04:10:28+5:30
अमरावती : राज्य शासनाचे महाडीबीटी पोर्टलवरील शेतकरी योजनांकरीता दाखल ऑनलाईन अर्जांमध्ये ६,४२० शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली होती. यात ...
अमरावती : राज्य शासनाचे महाडीबीटी पोर्टलवरील शेतकरी योजनांकरीता दाखल ऑनलाईन अर्जांमध्ये ६,४२० शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली होती. यात आतापर्यंत २,६९६ शेतकऱ्यांनीच कागदपत्राची पूर्तता केली आहे. अद्याप ३,५०६ शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली नाही. यासाठी १० जुलै ‘डेडलाईन’ दिल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी योजनांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रतिथेंब अधिक पीक, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्न धान्य पिके, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- वाणिज्यिक पिके व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात आली होती. यात लॉटरी पद्धतीने शेतकरी लाभार्थींची निवड करण्यात आली. निवड झालेल्या शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ पाठविण्यात आला. याला बराच कालावधी झाला असतानाही शेतकरी लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड केलेली नसल्याने प्रशासनाला पुढील प्रक्रिया करता आलेली नाही. त्यामुळे हे सर्व शेतकरी योजनेत सहभाग घेण्यास इच्छुक नाही, असे आता कृषी विभाग गृहीत धरून अर्ज रद्द करणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.