सुपरमध्ये ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; ५१ वर्षाच्या आईने ३० वर्षीय मुलाला दिले जीवनदान
By उज्वल भालेकर | Published: February 10, 2024 08:05 PM2024-02-10T20:05:53+5:302024-02-10T20:06:48+5:30
या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुलगा आणि आई या दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे शुक्रवारी ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ३० वर्षीय मुलाला ५१ वर्षीय आईने किडनी दान करून नवे जीवनदान दिले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुलगा आणि आई या दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे अमरावती विभागातून किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन गावातील रहिवासी असलेला मोहम्मद समीर मोहम्मद सिकंदर मागील ९ महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. परंतु मुलाला होणारा त्रास लक्षात घेता आई बद्रूनिसा बी सिकंदर मोहम्मद (५१) यांनी एक किडनी मुलाला दान करण्याचा निर्णय घेतला होता.
अखेर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. ही शस्त्रक्रिया एमएस डॉ. अमोल नरोटे व ओएसडी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ. नयन काकडे, युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अली, डॉ. सुनीता हिवसे, किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी यांनी यशस्वी केली.