मतमोजणीसाठी ३६ टेबल वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:10 PM2019-04-29T23:10:38+5:302019-04-29T23:11:00+5:30
लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व याबाबत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ही परवानगी मिळालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व याबाबत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ही परवानगी मिळालेली नाही.
जिल्हा निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार नेमानी गोडाऊनमध्ये सहा गोदामांत सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. मात्र यावेळी लोकसभेसाठी २४ उमेदवार व नोटा असे २५ उमेदवार असल्याने मतमोजणीला साहाजिकच विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारा प्रत्येक मतदारसंघात २० असे एकूण १२० टेबलांचे नियोजन केलेले आहे. म्हणजेच मतमोजणीसाठी ३६ टेबल वाढणार आहे व यामुळे किमान तीन तास तरी अगोदर निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानुसार वाढीव टेबलांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. लवकरच आयोगाची मान्यता मिळेल, अन्यथा पूर्वीच्याच नियोजनाप्रमाणे मतमोजणी होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.
मतमोजणीचे टेबल वाढल्यास मनुष्बळदेखील वाढणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर व दोन सहायक राहणार आहे. त्यामुळे सहा मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला ३६० कर्मचारी लागतील. याव्यतिरिक्त अन्य १०० असे एकूण ४६० ते ५०० मनुष्यबळाचे नियोजन तयार आहे. यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात आहे. दोन हजार केंद्रांवरुन इव्हीएम नेमाणी गोडाऊनमध्ये सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
मतमोजणी प्रतिनिधीसाठी उमेदवारांची कसरत
एका विधानसभा मतदारसंघात २० टेबल गृहीत धरल्यास प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे २४ उमेदवारांचे २४ प्रतिनिधी राहतील, म्हणजेच एका मतदारसंघात २० टेबलवर ४८० उमेदवारांचे प्रतिनिधी राहतील. असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असल्याने २,८८० प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. मात्र, प्रमुख राजकीय पक्ष वगळता अन्य उमेदवारांसाठी ही परीक्षाच ठरणार आहे.
उमेदवारांची संख्या जास्त असल्याने फेरीदेखील जास्त होणार आहे. त्यामुळे १४ ऐवजी २० टेबलांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही. प्रस्ताव मान्य झाल्यास दोन ते तीन तास अगोदर निकाल लागेल.
- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी