अमरावती- पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान ३६ उत्सव विशेष ट्रेन
By गणेश वासनिक | Published: October 20, 2023 12:50 PM2023-10-20T12:50:48+5:302023-10-20T12:51:33+5:30
भुसावळ मध्य रेल्वे विभागाचा निर्णय, दिवाळी ये-जा करणे होणार सुकर
अमरावती : सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे भुसावळ विभागाने अमरावती- पुणे आणि बडनेरा - नाशिक दरम्यान ३६ उत्सव विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता विशेष मेमू ट्रेनची सेवा ५ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे.
यात अमरावती-पुणे मेमू ट्रेन गाडी क्रमांक ०१२०९ एकूण आठ फेऱ्यांमध्ये धावणार आहे. ५ ते ११ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक रविवार आणि बुधवारी अमरावती रेल्वे स्थानकावरून दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २ वाजून ४५ मिनिटांनी पाेहोचणार आहे. तसेच पुणे-अमरावती गाडी क्रमांक ०१२१० विशेष मेमू पुणे येथून ६ ते २० नोव्हेंबर २०२३ पर्यत दर गुरुवार आणि सोमवारी ०६ वाजून ३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १९.५० वाजता पोहोचणार आहे. या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरुळी, हडपसर आणि पुणे या रेल्वे स्थानकावर थांबे असणार आहे. या ट्रेनला ८ कार मेमू रेक आहेत.
बडनेरा - नाशिक गाडी क्रमांक०१२११ विशेष मेमू ट्रेनला एकूण २८ फेऱ्या असणार आहे. ही मेमू ट्रेन बडनेरा रेल्वे स्थानक येथून ६ ते १९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दररोज ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी नाशिक ७ वाजून ४० मिनीटांनी पोहोचले.
गाडी क्रमांक ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून ६ ते १९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दररोज २१.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकावर थांबे देण्तात आले आहे. या मेमू ट्रेनला एकूण ८ कार रेक असेल, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली.