पश्चिम विदर्भातील नऊ प्रकल्पांचे ३७ गेट उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:45+5:302021-09-11T04:14:45+5:30
चार दिवस पश्चिम विदर्भात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला होता. त्यामुळे अनेक प्रकल्पांो ...
चार दिवस पश्चिम विदर्भात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला होता. त्यामुळे अनेक प्रकल्पांो गेट उघडण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने अनेक प्रकल्पांचे उघडलेले गेट पुन्हा बंद करण्यात आले. मात्र, अद्यापही मोठे व मध्यम अशा नऊ प्रकल्पांचे ३७ गेट अद्यापही उघडे असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. विदर्भात आणखीन सात दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.
उर्ध्व वर्धा प्रकल्पांचे गुरुवारी १३ दरवाजे उघडण्यात आले होेते. आता १० दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले असून, तीन दरवाजे ३५ सेंमीने कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरण परिसरात पर्याटकांनी गर्दी केली आहे. या प्रकल्पात १० सप्टेंबरच्या नोंदणीनुसार ९६.५७ टक्के पाणीसाठा आहे.
यवतमाळ जिल्ह्यतील अरुणावती मोठ्या प्रकल्पात ९७.६० टक्के पाणीसाठा असून ३ गेट १० सेंमी तर बेंबळा प्रकल्पात ८८.४१ टक्के पाणीसाठा असून १० गेट ५० सेंमीने उघडण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यताील खडकपूर्णा मोठ्या प्रकल्पात ८७.२ टक्के पाणीसाठा असून ३ गेट ३० सेंमीने उघडण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९५.२४ टक्के पाणीसाठा झाला असून ४ गेट ५ सेंमीने तर चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ९३.९९ टक्के पाणीसाठा असून २ गेट ५ सेंमीने तर पूर्णा प्रकल्पात ७९.९० टक्के पाणीसाठा असून ३ गेट १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून ४ गेट २४ सेंमीने तर वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ९१.१५ टक्के पाणीसाठा असून ५ गेट ५ सेंमीने उघण्यात आले आहेत.
बॉक्स:
५११ सिंचन प्रकल्पात ८३.४३ टक्के पाणीसाठा
विभागातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५११ सिंचन प्रकल्पांत सरासरी ८३.४३ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये नऊ मोठ्या प्रकल्पात ९०.३५ टक्के, २५ मध्यम प्रकल्पात ८३.३३ टक्के तर ४७७ लघु प्रकल्पात ७५.०८ टक्के पाणीसाठा साचला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची सोय झाली आहे.