महापालिकेतील ३७ सुरक्षारक्षकांना कात्री
By admin | Published: February 3, 2017 12:17 AM2017-02-03T00:17:10+5:302017-02-03T00:17:10+5:30
अमृत’ संस्थेकडून महापालिकेला पुरविण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कात्री लावण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून ३७ सुरक्षारक्षकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.
आस्थापना खर्चात बचत : पुन्हा उजळणी
अमरावती : ‘अमृत’ संस्थेकडून महापालिकेला पुरविण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कात्री लावण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून ३७ सुरक्षारक्षकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. ज्याठिकाणी सुरक्षारक्षकांची आवश्यकता नाही, अशा ठिकाणचे सुरक्षारक्षक कमी करण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. भविष्यात आणखी सुरक्षारक्षक कमी करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांसह प्रशासकीय विभागात ‘अमृत’ याकंत्राटी एजन्सीकडून महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविण्यात येत आहेत. मे २०१६ मध्ये ‘अमृत’ला १४६ सुरक्षारक्षक पुरविण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. वेळोवेळी मागणीनुसार सुरक्षारक्षक वाढविण्यात आलेत. आॅगस्ट २०१६ मध्ये सुरक्षारक्षकांची संख्या १७८ वर जाऊन पोहोचली. ‘लोकमत’ने यासंदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेतून ‘अमृत’ या संस्थेकडून होत असलेल्या अटी-शर्र्तींच्या उल्लंघनावर प्रकाशझोत टाकला. त्याचवेळी सुरक्षारक्षकांच्या संख्येची आवश्यकतेनुसार पडताळणी व्हावी, असा अभिप्राय अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिला. तत्पूर्वीच आयुक्त हेमंत पवार यांनी महापालिकेत कंत्राटी तत्वावर कार्यरत संपूर्ण कर्मचाऱ्यांचा ‘रिव्ह्यू’ घेतला. त्यात त्यांना अनेक ठिकाणी वाजवीपेक्षा अधिक आणि काही ठिकाणी गरज नसताना सुरक्षारक्षक आढळून आलेत. त्यानुसार आस्थापना खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी विभागनिहाय आढावा घेतला व त्यानंतर ‘अमृत’च्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षारक्षकांच्या कपातीबाबत अवगत करण्यात आले. ३७ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केल्याने महापालिकेची महिन्याकाठी ३ लाख २२ हजार रूपयांपर्यंत आर्थिक बचत होणार आहे. ३७ सुरक्षारक्षक १ फेबु्रवारीला कमी करण्यात आलेत. यानंतरही ही कपात केली जाणार आहे. अगदी आवश्यक असलेल्या ठिकाणीच सुरक्षारक्षक कार्यरत राहतील. कामावरुन कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांबाबत ‘अमृत’ कडूनही संबंधित विभागप्रमुखांना कळविण्यात आले आहे.