एकाच ठिकाणी आढळले ३७ साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:56 PM2018-08-08T22:56:10+5:302018-08-08T22:56:34+5:30
भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी ३७ साप आढळून आल्याने खळबळ उडाली. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांचा सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी ३७ साप आढळून आल्याने खळबळ उडाली. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांचा सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
उत्तमसऱ्यातील वसा रेस्क्यू सेंटरमधील शौचालयाच्या मागे इंधन ठेवले आहे. बुधवारी सकाळी वसाचे सर्पमित्र भूषण सायंके तेथे गेले असता, त्यांना शौचालयाजवळ सापाची दोन पिल्लं आढळून आली. तिथे ठेवलेल्या इंधनामधून फुत्कार ऐकू आला. रहदारीचा रस्ता आणि सेंटरमधील उपचार घेत असलेले प्राणी जवळपास फिरत असल्याने त्यांनी लगेच वसाचे पॅरा-वेट्स शुभम सायंके यांना बोलावून पिल्ले व मादी साप इंधनाबाहेर काढले. त्यावेळी त्या ठिकाणी मादी साप व ३६ पिल्ले आढळून आलीत. सर्पमित्रांनी साप घेऊन बडनेरा वनक्षेत्राचे कार्यालय गाठले. तिथे रीतसर नोंद करून वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सापांना नजीकच्या परिसरात मुक्त करण्यात आले. यावेळी वसाचे गणेश अकर्ते, सागर शृंगारे, शैलेश आखरे, मुकेश वाघमारे, सागर फुटाणे, रोहित रेवाळकर, अनिकेत सरोदे तसेच विशाल भटकर, गवई हे वनअधिकारी आणि अभि दाणी, अक्षय चांबटकर, ठकसेन इंगोले हे वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.
घोणस देतो पिलांना जन्म
सापांमध्ये प्रजनन प्रक्रियेनुसार विविपॅरस (अंडी घालणारी) आणि ओव्होव्हिव्हीपॅरस (पिलांना जन्म घालणारी) असे प्रकार आहेत. घोणस साप जानेवारी ते मे दरम्यान प्रजनन करताना आढळून आले आहेत आणि त्यांची नवजात पिल्ले जून ते आॅक्टोबर महिन्यात दिसून येतात.
म्हाडा कॉलनीतील सर्पमित्र जय सोहने यांना परिसरातून दोन फुटाचा अजगर पकडून सर्पमित्र धीरज शिंदे (रा. किरणनगर) यांच्या ताब्यात दिला. त्यांनी वनविभागाकडे नोंद करून अजगराला जंगलात सोडले.
घोणस सापाची मादी १४ ते ६९ पिले देऊ शकते. आम्ही मादी घोणस व तिच्या ३६ पिलांची सुटका केली. या मादी घोणसची लांबी ४ फूट ११ इंच, तर पिलं ६ ते ९ इंच लांबीची आहेत.
- निखिल फुटाणे, सर्पमित्र, वसा संस्था, अमरावती