३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

By Admin | Published: April 15, 2016 12:11 AM2016-04-15T00:11:53+5:302016-04-15T00:42:51+5:30

एम़जी़ मोमीन ल्ल जळकोट तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना

37 villages acquisition, tanker water | ३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

३७ गावांना अधिग्रहण, टँकरचे पाणी

googlenewsNext

टंचाईची तीव्रता वाढली : घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती
एम़जी़ मोमीन ल्ल जळकोट
तालुक्यात ४७ पैकी ३७ गावांत सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ही टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने १४ गावे व ७ वाड्यांना २० टँकरने तसेच या गावांसह अन्य ३७ गावांना ५१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ यंदा १९७२ पेक्षा अधिक कठीण परिस्थिती झाली आहे़
जळकोट तालुक्यात ४७ गावे आहेत़ जळकोट शहर वगळले तर सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ वाढत्या उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पाणीटंचाई दूर करण्यासाठी माळहिप्परगा तलावात एक सार्वजनिक विहिर घेऊन तेथून टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला १० मार्चला देण्यात आले होते़ परंतु, अद्यापही त्याचे अंदाजपत्रक तयार झाले नसल्याने ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील यांनी दिली़
जगळपूर पंचायत समिती गणातील अधिग्रहण करण्यात आलेले जलस्त्रोत आटल्याने तेथे सुरु असलेले टँकर पाण्याअभावी जागवेर उभे आहेत़ तसेच जगळपूर, हावरगा, डोमगाव येथील टँकरलाही पाणी मिळेनासे झाले आहे़ होकर्णा, उमरदरा, शेलदरा, सिंदगी या गावांना नांदेड जिल्ह्यातील नंदनशिवणी तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे़ याशिवाय, तालुक्यातील करंजी, सोनवळा, बेळसांगवी, बोरगाव आदी तांड्यावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़
पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ तालुक्यातील पशूधन संख्या ५५ हजार आहे़ शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळल्याने कडब्याचे उत्पन्न घटले आहे़ यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अत्यल्प प्रमाणात ज्वारीचा पेरा झाला होता़ त्यामुळे कडब्याची पेंढी २३ रूपयांना विक्री केली जात आहे़ त्यामुळे पशूपालकांना चाऱ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे़ तसेच तालुक्यात मजूरांची संख्या २५ हजार आहे़ सध्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर गाव सोडून जाण्याची पाळी येऊन ठेपली आहे़ काही मजुरांनी मोठ्या शहरांकडे धाव घेतली आहे़
मजुरांना काम, नागरिकांना पाणी व जनावरांना चारा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मन्मथ किडे, सरपंच बालाजी आगलावे, बालाजी बारमळे, मारोती पांडे, संतोष तिडके, दत्ता पवार, बाबुराव जाधव, रामराव राठोड, शांताबाई अदावळे, अर्जुन पाटील आदींनी केली आहे़
चारा छावण्यांसाठी ; संस्थांचा पुढाकार हवा़़़
पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे़ आवश्यक तिथे टँकर मंजूर केले जात आहेत़ पशूधनांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरु करण्याकरिता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिवनंदा लंगडापूरे, गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी केले आहे़ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी डॉ़ विकास खरात यांनी सांगितले़
दुष्काळामुळे मागेल त्याला काम, आवश्यक तिथे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत़ उदगीर व जळकोट तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तात्काळ परिस्थितीची माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़

Web Title: 37 villages acquisition, tanker water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.