३.७३ लाख कुटुंबांना ‘आरोग्य विमा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 10:58 PM2018-06-03T22:58:08+5:302018-06-03T22:58:25+5:30
प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ५ लाखांचे आरोग्य विमा कवच या अंतर्गत देण्यात येणार असून, देशात कुठेही आरोग्य उपचार घेता येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ३.७३ लाख कुटुंब या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.
आयुष्यमान भारत आरोग्य योजनेसाठी शहर व ग्रामीण भागातील लाभार्थी ठरविण्यासाठी कुटुंब सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सन २०११ च्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार संपूर्ण जिल्ह्यात ३.७३ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा व शहर आरोग्य यंत्रणेला १५ जूनची 'डेडलाईन' देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण घेऊन सात वर्षे झाल्याने या काळात संबंधित कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा आहे, याची पाहणी व माहिती संकलन या नव्या सर्वेक्षण मोहिमेत केले जाणार आहे. संबंधित कुटुंबांची आर्थिक स्थिती, कुटुंबप्रमुखांचा मोबाईल नंबर, शिधापत्रिका क्रमांक, आधार तसेच कुटुंबातील मागील सात वर्षांतील जन्म-मृत्यू तसेच कुटुंबात पडलेली नव्या सदस्यांची भर आदी मुद्यांची माहिती संकलित केली जात आहे. या योजनेचे जिल्हा समन्वयक इंद्रजित किल्लेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीणमधील २.८३ लाख कुटुंब, तर एक महापालिका व १० नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे ९०,०३७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. यात महापालिका क्षेत्रातील ५४ हजार कुटुंबाचे सर्वेक्षणही हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्यात आल्या. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या याद्या आरोग्य विभागाकडून ‘डाऊनलोड’ करण्यात आल्या असून त्या याद्या ‘अप टू डेट’ करण्यात येणार आहेत. ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका आणि पारिचारिकांची या सर्वेक्षणासाठी मदत घेण्यात येत आहे. महापालिका स्तरावर १२६ आशा, ४० अधिपरिचारिका (एएनएम), १२ वैद्यकीय अधिकारी व ६ पीएचएनच्या सहाय्याने सर्वेक्षणास प्रारंभ झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली
अशी आहे योजना
लाभार्थी कुटुंबाला पाच लाख रूपये विमा संरक्षण मिळणार आहे. सर्वेक्षण पूर्णत्वानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल. एकूण ९७२ आजारांवर नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहेत. १०९७ या टोल फ्री क्रमांकावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलन करून आॅनलाईन पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आधार आयडी देण्यात येणार आहे.
आयुष्यमान भारत’ या योजनेसाठी महापालिका स्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आलेत. २७ मे पासून कुटुंब सर्वेक्षणास सुरूवात झाली. आशा आणि एएनएमला प्रशिक्षित करण्यात आले. शहरातील ५४ हजार लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल.
- सीमा नैताम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा