मार्चपश्चात ३७३ गावांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:50+5:302021-03-08T04:13:50+5:30

गजानन मोहोड अमरावती : पावसाळापश्चात आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याची खैर राखली आहे. भूजलस्थिती काठावरच असल्याने अर्ध्याअधिक गावांना यंदाचा उन्हाळा ...

373 villages dry after March | मार्चपश्चात ३७३ गावांना कोरड

मार्चपश्चात ३७३ गावांना कोरड

Next

गजानन मोहोड

अमरावती : पावसाळापश्चात आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याची खैर राखली आहे. भूजलस्थिती काठावरच असल्याने अर्ध्याअधिक गावांना यंदाचा उन्हाळा जड जाणार नाही. मात्र, ३७३ गावांना मार्चपश्चात कोरड राहणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३७३ उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर किमान ६.४६ कोटींचा खर्च होणार आहे.

पाच वर्षांचा आढावा घेता जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलीच नाही. मात्र, त्या तुलनेत यंदा मेळघाट वगळता ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाल्याने भूजलस्थिती भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूरबाजार तालुक्यात दीड मीटरपर्यंत वाढली, तर उर्वरित ११ तालुक्यांत मात्र, सरासरी इतकीच आहे. त्यामुळे जलस्त्रोत सध्या कोरडे पडले नसले तरी, मार्च महिन्यापश्चात ४५ अंशाच्या तापमानात त्यांना बुड लागण्याची शक्यता आहे. यंदा प्रकल्पांमध्ये शतप्रतिशत साठा असल्याने रबी पिकांना कालव्याचे पाणी मिळाले व विहिरीद्वारे होणारा अमऱ्याद उपसा काहीसा थांबल्याचा असर भूजलस्तराच्या वाढीवर झालेला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जरा उशिराच जाग आलेली आहे. साधारणपणे डिसेंबर महिन्यात तयार करण्यात येणारा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा चक्क मार्च महिन्यात तयार झालेला आहे. आता यासाठीही कोरोना संसर्गाचे कारण देणार काय, असा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने पावसाळा लागला तरी पाणीपुरवठ्याचे कामे सुरूच राहत असल्याची उदाहरणे आहेत. निविदा प्रक्रियेला उशीर होतो व यासह अनेक कामेही बारगळल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

खासगी २२६ विहिरींचे अधिग्रहण करणार

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत २२६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे व यात अमरावती तालुक्यात ३१, नांदगाव खंडेश्वर २८, भातकुली १२, मोर्शी ४९, वरूड ३९, चांदूर रेल्वे ३०, धामणगाव रेल्वे २४, चांदूर बाजार व अंजनगाव सुर्जी ३ व चिखलदरा तालुक्यात सात विहिरींचे अधिग्रहण केल्या जाणार आहे.

बॉक्स

१५ टँकरसह ८८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी यंदा १५ टँकरचे नियोजन आहे. याशिवाय ८८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जाईल. यात अमरावती तालुक्यात ६, नांदगाव खंडेश्वर १३, तिवसा ४, मोर्शी १३, वरूड ९, चांदूर रेल्वे ११, धामणगाव २६, चिखलदरा ४, चांदूरबाजार व अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रत्येकी १ नळयोजनेची दुरुस्ती केली जाईल.

बॉक्स

२३ तात्पुरत्या योजना, ३५ विंधन विहिरी

तात्पुरत्या २३ पूरक नळयोजना तयार करण्यात येतील. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात १२, चिखलदरा ४, अचलपूर ५ व अमरावती आणि मोर्शी तालुक्यात प्रत्येकी १ राहणार आहे. याशिवाय ३५ विंधनविहिरी तयार करण्यात येतील. यात धामणगाव ११, चांदूर बाजार व नांदगाव खंडेश्वर ६, तिवसा २ व अचलपूर, चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी एक राहणार आहे.

बॉक्स

एप्रिल ते जूनसाठी ४४१ उपाययोजना प्रस्तावित

यंदा उन्हाची प्रखरता असणाऱ्या एप्रिल ते जून या कालावधीत ४४१ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यात अमरावती तालुक्यात ४४, नांदगाव ५०, तिवसा २१, मोर्शी ६३, वरूड ५२, चांदूर रेल्वे ५४, धामणगाव ६२, अचलपूर ६, चांदूरबाजार २३, अंजनगाव २, चिखलदरा तालुक्यासाठी २४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.

बॉक्स

असा लागणार तालुकानिहाय निधी

२८१ गावांमधील ४४१ उपाययोजनांसाठी ६.४६ कोटींचा खर्च येणार आहे. यात अमरावती तालुक्यात ४४.२४ लाख, नांदगाव ५८.६२ लाख, तिवसा २१.९८ लाख, मोर्शी ९१.४६ लाख, वरूड ५६.५६ लाख, चांदूर रेल्वे ४४.२० लाख, धामणगाव १.५१ कोटी, अचलपूर २८ लाख, चांदूरबाजार ७५.६२, लाख, अंजनगाव ४.६२ लाख व चिखलदरा तालुक्यात ६९.५३ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. भातकुली तालुका निरंक आहे.

पाईंटर

एप्रिल ते जून कालावधी

पाणीटंचाईची एकूण गावे : ३८३

एकूण उपायोजना प्रस्तावित : ४०१

१३ तालुक्यांसाठी खर्च : ६.४६ कोटी

Web Title: 373 villages dry after March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.