३७८ पीएचडी, १०५ सुवर्ण, २२ रौप्य पदकांनी गौरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:48 AM2018-12-21T00:48:18+5:302018-12-21T00:48:53+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. यावेळी ३७८ संशोधकांना आचार्य (पीएचडी), गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना विद्याशाखानिहाय १०५ सुवर्ण, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३९,७३० पदवी आणि ४० विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. यावेळी ३७८ संशोधकांना आचार्य (पीएचडी), गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना विद्याशाखानिहाय १०५ सुवर्ण, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३९,७३० पदवी आणि ४० विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
विद्यापीठ परिसरात साकारण्यात आलेल्या मंडपात दीक्षांत समारंभ झाला. विशेष अतिथी म्हणून पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, प्राचार्य एफ.सी. रघुवंशी, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, लेखा व वित्त अधिकारी भारत कराड, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव, अधिष्ठाता डी.डब्लू. निचित, एस.आर. देशमुख, एम.पी. काळे, पी.ए. वाडेगावकर आदी उपस्थित होते.
दीक्षांत समारंभस्थळी पाहुण्यांचे मिरवणुकीने आगमन झाले. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण त्यांच्या हस्ते झाले. डॉ. के. कस्तुरीरंगन व कुलगुरू चांदेकर यांनी विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके देऊन गौरविले. सर्वाधिक सहा सुवर्णपदके व एक रोख पारितोषिक बहि:शाल विद्यार्थिनी सोनाली खडसे हिने पटकावले. प्रतीक्षा रेखाते, दीपाली खडक्कर, देवश्री वºहाडे, आयुष गुप्ता, समीक्षा नाथे आदी गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभाला माजी कुलगुरू जी.व्ही. पाटील, कमलताई गवई, पद्मा चांदेकर, पद्मिनी जयपूरकर, अनिहा देशमुख, व्ही.एस. जामोदे, जयकिरण तिडके, जयंत वडते, डी.टी. इंगोले, वंदन मोहोड, दिनेशकुमार जोशी, भीमराव वाघमारे, यांच्यासह शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ, आजी-माजी प्राधिकारिणी सदस्य, प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यापीठाचे विभागप्रमुख आणि पदवीकांक्षी विद्यार्थी उपस्थित होते. संचालन हेमंत खडके व अलका गायकवाड यांनी केले. समारंभाची राष्ट्रगीताने सांगता झाली.
उपेक्षितांच्या समस्या सोडविण्यासाठी योगदान द्या
विद्यापीठाने गाडगेबाबांची दशसूत्री पुढे ठेवून वाटचाल सुरू केली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात थोडा तरी परोपकार करावा, असे बाबांनी सांगितले आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षितांच्या समस्या दूर करण्यासाठी योगदान द्यायला हवे. आपल्याला आज सहजपणे शिक्षण उपलब्ध झाले असून, त्याचा उपयोग समाज घडविण्यासाठी होऊ द्या, असा संदेश कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून दिला.
स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाचे सात मानकरी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दीक्षांत समारंभात विविध विषयांत गुणवंत ठरलेल्या सात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्णपदकाने गौरविले. यात मेघे अभियांत्रिकीची देवश्री वºहाडे, आरती फाळके, आयुष गुप्ता, यवतमाळच्या नांदूरकर अभियांत्रिकीची श्रद्धा दाळवे, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीचे आनंद धारिया, जयंत कोठारी तसेच अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाची मुनमुन श्रीवास यांचा समावेश आहे.
सोनाली खडसे, देवश्री वऱ्हाडेचा सन्मान
विद्यापीठातून सर्वाधिक सहा सुवर्णपदके प्राप्त करणाऱ्या सोनाली खडसे या बहि:शाल विद्यार्थिनीसह अभियांत्रिकी स्थापत्य शाखेतून प्रथम येणारी तसेच विद्यापीठातील सर्व शाखांमधून प्रथम येऊन पाच सुवर्णपदकांची मानकरी ठरलेली देवश्री नंदकिशोर वऱ्हाडे या विद्यार्थिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
छायाचित्र, सेल्फीसाठी गर्दी
समारंभात पारितोषिकांचे वितरण होताच विद्यार्थ्यांनी मंडपाबाहेर लागलेल्या स्टॉलवर जाऊन आपली छायाचित्रे काढून घेतली. याशिवाय मंडपात आणि मंडपाबाहेर विद्यार्थ्यांनी सेल्फीसाठी मोठी गर्दीदेखील केली होती. शैक्षणिक आयुष्यातील शेवटचा टप्पा असलेल्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांनी यशाचा मनमुराद आनंद लुटला.