३८४ महाविद्यालये परवानगीच्या प्रतीक्षेत, विद्यापीठाचे विभागीय आयुक्तांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:31+5:302021-02-08T04:12:31+5:30
अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ...
अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संलग्न ३८४ महाविद्यालयांसाठी विभागीय आयुक्तांना शनिवारी पत्र पाठवून परवानगी मागितली आहे.
अकृषि विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरू करण्याचे धाेरण राबविले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू होतील. अंतिम वर्ष, अंतिम सत्रातील शिकवणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, विद्यार्थी, प्राध्यापकांची सुरक्षितता जाेपासली जाणार आहे. महाविद्यालयात गर्दी होणार नाही. मास्कचा वापर, दाेन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे शारीरिक अंतर, थर्मल गनद्वारे तापमानाची तपासणी आदी नियमावलींचे पालन करावे लागणार आहे.
तत्पूर्वी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात येणार आहे. कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकारेपणे करावे लागणार आहे. ताप, खोकला किंवा सर्दी असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश असणार नाही, ही बाब प्रशासनाने स्पष्ट केली. ५ नोव्हेंबर २०२० रोजी यूजीसीच्या नियमांचे पालन करणे शिक्षण संस्थाचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
-----------------
विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतरच निर्णय
अमरावती विभागात कोरोना संसर्गाचा वेग वाढतो आहे. त्यामुळे जिल्हानिहाय कोरोना संसर्गाचे रुग्ण आणि स्थानिक परिस्थितीचा वेध घेऊन महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून गाईडलाईन आल्यानंतरच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.