३९ लघु प्रकल्पांत फक्त ‘मृतसाठा’
By admin | Published: May 6, 2016 12:13 AM2016-05-06T00:13:44+5:302016-05-06T00:13:44+5:30
सलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे.
पाणीबाणी : २४ प्रकल्प कोरडे, उर्ध्व वर्धातही ४० टक्के ‘डेड वॉटर’
गजानन मोहोड अमरावती
सलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे. सद्यस्थितीत २४ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले असून ३९ लघु प्रकल्पांत केवळ मृतसाठा शिल्लक आहे. ४ मध्यम प्रकल्पातही सद्या ९.०४ दलघमी व उर्ध्व वर्धा प्रकल्पातही सध्या असणाऱ्या १४४.१० दलघमी साठ्यामध्ये ११४.२२ दलघमी मृतसाठा आहे. प्रकल्पात असणाऱ्या एकूण साठ्यापैकी रोज १ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पावसाळा माघारल्यास जिल्ह्याची तहान भागणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात एकमेव असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणात सद्यास्थितीत ५६४.०५ जीवंत साठ्याच्या तुलनेत १४४.१० दलघमी साठा शिल्लक आहे व यामध्ये ही ११४.२२ मृतसाठा असल्याने प्रत्यक्षतात २९.१० दलघमी जलसाठा असल्याची जलसंपदा विभागाची माहिती आहे.
जिल्ह्यातील ४ प्रकल्पांपैकी शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत २०.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे व यामध्ये ही १.८१ दलघमी मृतसाठा आहे. चंद्रभागा धरणात आज १५.४१ दलघमी जलसाठा आहे. यापैकी ०.१८ दलघमी मृतसाठा आहे. पूर्णा प्रकल्पात सद्या १४.५५ दलघमी जलसाठ्यामध्ये ८.१६ दलघमी मृतसाठा आहे व सपण प्रकल्पात सद्यास्थितीत असणाऱ्या १८.५४ दलघमी जलसाठ्या मध्ये ०.६६ दलघमी मृतसाठा आहे. एकूण चार मध्यम प्रकल्पात १६१.२६ जिवंत जलसाठ्यापैकी सद्यस्थितीत ७१.२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यामध्येही ९.०४ दलघमी मृतसाठा आहे.
जिल्ह्यात ७५ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ८९२.७७ जलसाठ्याच्या तुलनेत सद्यास्थितीत ३७७.९१ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये २३६.३१ दलघमी मृतसाठा असल्याने या लघुप्रकल्पात फक्त १४१.६० दलघमी पाण्याचा साठा शिाल्लक आहे. यंदा जर पावसाळा माघारल्यास मृतसाठ्यावर तहान भागवावी लागेल.
पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन मृग नक्षत्रात वेळेवर झाले तरीही मान्सून नियमित व्हायला जूनचा दुसरा आठवडा लागतो. त्यानंतर कोरड्या पडलेल्या जलप्रकल्पात पाण्याचा संचय होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वच घटक यंदा मान्सून लवकर यावा असी प्रतीक्षा करीत आहे.
एक दलघमी म्हणजे १०० कोटी लिटर
एक दलघमी म्हणजे १०० कोटी लीटर पाणी जिल्ह्यात एकमेव मुख्य असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यास्थिीत १४४.१० दलघमी म्हणजे १४४ कोटी लिटर पाण्याचा साठा शिल्लक आहे. पाणी पुरवठा योजना , शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी दररोज या पाण्याचा वापर होत आहे व सद्यास्थितीत असणाऱ्या जलसाठ्यापैकी १०० कोणी लिटर पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे.