जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पांत ३९.७७ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:41+5:302021-07-12T04:09:41+5:30
अमरावती : जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघू अशा एकूण ९० सिंचन प्रकल्पांत ११ जुलै रोजीच्या जलसंपदा ...
अमरावती : जिल्ह्यातील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघू अशा एकूण ९० सिंचन प्रकल्पांत ११ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार सरासरी ३९.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने काही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
१० ते १२ दिवस पावसाने दडी मारल्याने यंदा सिंचन प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा साचणार की कसे, हा प्रश्न अमरावतीकरांना लागला होता. मात्र शनिवारी पावसाने उशिरा का होईना, मात्र दमदार हजेरी लावली. बडनेरा, दर्यापूर, अंजनगाव, भातकुली यांसह अनेक तालुक्यांमध्ये जोेरदार पाऊस झाला. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ४५.१८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिनांकापर्यंत ५७.५१ टक्के पाणीसाठा साचला होता, तर ८४ लघू प्रकल्पांत सरासरी २८.७४ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पाच्या पाणीसाठ्याची नोंद ही ८ जुलै रोजी घेण्यात आल्याची अधिकाऱ्यांन सांगितले.
बॉक्स:
पाच मध्यम प्रकल्पांची स्थिती
जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ३७.३५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिनांकापर्यंत ३८.२० टक्के पाणीसाठा होता. आता शहानूर प्रकल्पात ३६.८८ टक्के, चंद्रभागा ४७.९० टक्के, पूर्णा प्रकल्पात ५५.८९ टक्के, सपन ५२.४९ टक्के, पंढरी मध्यम प्रकल्पात ८.०१ टक्के पाणीसाठा साचला आहे. यंदा पिण्याच्या पाण्याची जरी टंचाई नसली तरी भविष्यात सिंचनासाठी पाणी देताना प्रकल्प शंभर टक्के भरणे अपेक्षित आहे.