ॲप डाऊनलोड करताच ४.८२ लाख गायब; धारणीच्या वृध्देची फसवणूक, वीज पुरवठा खंडितची बतावणी
By प्रदीप भाकरे | Published: February 5, 2023 01:29 PM2023-02-05T13:29:33+5:302023-02-05T13:29:53+5:30
थकीत देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून धारणी येथील एका वृध्देची ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.
अमरावती:
थकीत देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून धारणी येथील एका वृध्देची ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ३ ते ४ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी, धारणी पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी अज्ञात मोबाईलधारकाविरूध्द गुन्हा दाखल केला.
धारणीलगतच्या दुणी येथील ६२ वर्षीय महिला ही सेवानिवृत्त असून तिचे धारणीच्या एसबीआयमध्ये खाते आहे. त्यात निवृत्तीलाभासह अन्य काही रक्कम देखील जमा आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने वृध्देला कॉल केला. आपण पुणे येथील एमएसईबीमधून बोलत असून, थकीत इलेक्ट्रिक बील भरले नाही, तर वीज पुरवठा खंडित केल्या जाईल, असे सांगून बिल ऑनलाईन भरण्यास सांगितले. त्यावर आपल्याला ऑनलाईन पैसे भरता येत नसल्याचे वृध्देने सांगितले. त्यावर आरोपीने मोबाईलवर महावितरण, टीम व्हीवर, क्विक सपोर्ट, एसएमएस फॉरवर्डर आणि महा मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे वृध्देने ते ॲप डाऊनलोड करताना एसबीआयधील बॅंक खात्याची माहिती दिली. त्याचवेळी त्यांच्या खात्यातून ४ लाख ८२ हजार ६४८ रुपये परस्परच डेबिट झाले. ती रक्कम डेबिट झाल्याचे बँक स्टेटमेंट वरुन त्यांना कळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धारणी पोलीस ठाणे गाठले.