‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 05:54 PM2021-12-20T17:54:39+5:302021-12-20T18:01:25+5:30
शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरात विविध घटना उघड झाल्या असून गेल्या २४ तासांत पोलिसांनी ४ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
अमरावती :ऑनलाइन व्यवहार करताना सजग राहा, कुठलेही ॲप डाऊनलोड करताना अनेकदा विचार करा, कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका, ओटीपी शेअर करू नका, असे आवाहन केले जात असतानाही ऑनलाइन फ्रॉडचे गुन्हे थांबलेले नाहीत. कधी कॅशबॅकच्या आमिषाला बळी पडत, तर कधी क्रेडिट पॉइंटच्या नावावर आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगारांचा तुमच्या बँक बॅलन्सवर डोळा असताना तुम्ही कधी होणार स्मार्ट, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
कॅशबॅकच्या नावावर ११ हजारांचा चुना कॅशबॅक मिळाल्याची बतावणी करून संदीप भास्करराव बुटे (साईनगर) यांना ११ हजार रुपयांनी ऑनलाइन गंडविण्यात आले. ८ डिसेंबर रोजी ही घटना घडली. फोन पे सर्व्हिस सेंटरमधून बोलत असल्याची बतावणी करून कॅशबॅक आल्याचे सांगण्यात आले. फोन पे खाते उघडून त्यावरील लिंकवर क्लिक करायला सांगण्यात आले. बुटे यांच्या अकाउंटमधून पैसे कमी व्हायला लागले. तेव्हा एका मोबाइलधारकाने एनी डेस्क डाऊनलोड करण्यास सांगितले. ते करताच त्यांच्या खात्यातून ११ हजार रुपये डेबिट झाले. १८ डिसेंबर रोजी राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
लॅपटॉपच्या नावे ४१५३० रुपयांची फसवणूक
लॅपटॉपची ऑनलाइन खरेदीसाठी मदत करीत असल्याचे सांगून एकाला एनीडेस्क ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. ते केल्यानंतर सचिन झाडे (२३, गाडगेनगर) याच्या खात्यातून ४१ हजार ५३० रुपये डेबिट झाले. ३ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविला.
ओटीपी शेअर करणे महागात
बँक खात्यात क्रेडिट रिवार्ड पाॅइंट जमा करण्याची बतावणी करून ओटीपी शेअर करण्यास सांगण्यात आले. तो शेअर करताच योगेश वानखडे (३३, नेताजी कॉलनी) यांच्या खात्यातून ५३ हजार ६८९ रुपये परस्पर वळते झाले. २५ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पैसे जमा करतो, पैसेच गेले
४५०० रुपये खात्यात जमा करण्याचे आमिष दाखवीत अर्जुननगर येथील एका महिलेला ५३ हजार ७०० रुपयांनी ऑनलाइन ठगविण्यात आले. ८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान ही घटना घडली. तिच्या संमतीशिवाय बँक खात्यातून ती रक्कम काढण्यात आली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गाडगेनगर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.