सावधान! एनी डेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे सायबर फ्राॅड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 02:49 PM2021-11-30T14:49:35+5:302021-11-30T14:53:45+5:30
स्थानिक गाडगेनगर पोलिसांनी तर २८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील चार गुन्हे नोंदविले आहेत. एनीडेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे हे सायबर फ्राॅड करण्यात आले.
अमरावती : कोविड १९चा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच, या काळात सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. ऑनलाइन वॉलेटची, क्रेडिट कार्डची केवायसी, नोकरीचे आमिष अशी विविध कारणे देत सायबर हल्लेखोर लोकांची फसवणूक करत असल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.
स्थानिक गाडगेनगर पोलिसांनी तर २८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील चार गुन्हे नोंदविले आहेत. एनीडेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे हे सायबर फ्राॅड करण्यात आले. तर एका प्रकरणात समाजमाध्यमावर पसंत केलेली दुचाकी पैसे देऊनही आलीच नाही. सायबर गुन्हेतज्ज्ञांच्या मते सायबर हल्लेखोर ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य करत आहेत.
एनीडेस्क डाउनलोड केले नि २५ हजार गमावले
मागितलेली वस्तू डिलिव्हर न झाल्याने सूचनेप्रमाणे एनीडेस्क डाऊनलोड केले नि २५ हजार गमावल्याची घटना येथील रोहिणी पार्क परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर रोजी दुपारी गाडगेनगर पोलिसांनी दोन मोबाइल क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पत्ता चुकीचे असल्याचे सांगत तेथील एका महिलेला एनीडेस्क डाउनलोड करण्यास सांगितले गेले. ते डाउनलोड केल्यानंतर ओटीपी आला व त्याच वेळी त्या महिलेच्या खात्यातून २५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाले. १२ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
टीम व्हूअरने ३० हजारांचा गंडा
बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होत असल्याची बतावणी करून एका ६२ वर्षीय व्यक्तीला टीम व्हूअर हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. सोबतच डेबिट कार्ड नंबर टाकून ३० रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्या वृद्धाच्या पत्नीच्या बँक खात्यातून २४ हजार ५५९ व ५ हजार रुपये कपात झाल्याचे दिसून आले. मार्डी रोडवरील अंबिका नगर येथे ११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणीदेखील गाडगेनगर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
केवायसीच्या नावावर १५ हजारांचा फ्रॉड
केवायसीच्या नावावर बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवून एका महिलेला १५ हजार रुपयांनी ऑनलाइन गंडा घालण्यात आला. १२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर रोजीदरम्यान हा घटनाक्रम घडला. याप्रकरणीदेखील २८ नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलिसांत तीन मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फोनपेवर अकाउंट ब्लँक दाखवत आहे, केवायसी करायची आहे, असा संदेश त्या महिलेच्या मोबाइलवर आला होता. त्यानंतर ही फसवणुकीची घटना घडली.
दुचाकी आलीच नाही, २१ हजार गेले
इन्स्टाग्रामवर बुक केलेली दुचाकी २१ हजार रुपये देऊनही मिळाली नाही. त्यात तब्बल पावणेदोन महिन्यांनी गाडगेनगर पोलिसांत अरुणा राणा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी आपली दुचाकी डिलिव्हर होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सरस्वतीनगरमधील एका महिलेने २१ हजार ३७९ रुपये डिलिव्हरीपूर्वीच संबंधिताला ऑनलाइन ट्रान्सफर केले. दुचाकी न आल्याने झालेली फसवणूक त्या महिलेच्या लक्षात आली. व सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली.