चांदूर रेल्वे शहरात एकाच दिवसात ४ ठिकाणी धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:28+5:302021-06-25T04:11:28+5:30
चांदूर रेल्वे : शहरात बुधवारी एकाच दिवसात अवैधरित्या पान मसाला, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या चौघांवर ठाणेदार ...
चांदूर रेल्वे : शहरात बुधवारी एकाच दिवसात अवैधरित्या पान मसाला, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या चौघांवर ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली असून यात ३, ६४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना ताब्यात घेण्यात आले होते.
बुधवारी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याकरिता ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात पीएसआय गणेश मुपडे, ना.पो.कॉ. विनोद वासेकर, पो. कॉ. शरद खेडकर व चालक पंकज शेंडे ही टीम गेली असता सर्वप्रथम सकाळी ११.४५ वाजता जुना मोटार स्टँड येथील मोहम्मद जाबीर (४०) यांच्या पानटपरीची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण ७४० रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, तंबाखू मिळून आला. दुपारी १२.०५ वाजता जुना मोटार स्टँड येथील सुधाकर बापुराव होले (६२, रा. सरदार चौक) यांच्या मामा पान सेंटरवर धाड टाकली असता तेथून ६३१ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दुपारी १२.४५ वाजता डांगरीपुरा येथील राहूल अनिल वाघाडे (२३, रा. डांगरीपुरा) यांच्या राहुल जनरल स्टोअर्सची पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये १३०९ रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, तंबाखू मिळून आला. यानंतर दुपारी १.१० वाजता डांगरीपुरा येथील गजानन आत्माराम सहारे (४८, रा. डांगरीपुरा) यांच्या कलात्मा किराणा दुकानात पोलिसांनी धाड टाकली असता तेथून ९६८ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. चारही आरोपींकडून एकूण ३६४८ रुपयांचा पान मसाला, सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी मिळून आल्याने सर्व माल जप्त करून चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींविरूद्ध भादंवी कलम १८८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश मुपडे, पो. कॉ. शरद खेडकर करीत आहे. चांदूर रेल्वे शहरात एकापाठोपाठ झालेल्या ४ कारवायांमुळे पान मसाला, सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पळसखेडमध्येही ४ हजारांचा मुद्देमाल जप्त
चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसखेडमध्ये ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात हे. कॉ. शिवाजी घुगे, ना. पो. कॉ. विनोद वासेकर व चालक जगदीश राठोड या पथकाने २२ जून रोजी सायंकाळी ६.५० वाजता आरोपी नंदलाल बन्सीलाल जयस्वाल (४९) यांच्या पानठेल्याची झडती घेतली असता त्यामध्ये २ हजार १६० रुपयांचा सुगंंधित तंबाखू, गुटखा व पानमसाला मिळून आला. तर आरोपी संदीप गणपतराव तिरमारे (४०, रा. पळसखेड) याच्या थैलीमध्ये १ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ४ हजार ४० रुपयांचा प्रतिबंधित असलेला सुगंंधित तंबाखू, गुटखा व पानमसाला अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला. मुद्देमालासह दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध भादंवी कलम १८८, २७२, २७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.