जिल्ह्यातील ४० आरोग्य केंद्र डॉक्टरांविना पोरके; एमबीबीएसची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 06:37 PM2018-12-03T18:37:21+5:302018-12-03T18:37:52+5:30
रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने तयार केलेले धोरण कुचकामी ठरत आहे. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना पोरकी आहेत.
- मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने तयार केलेले धोरण कुचकामी ठरत आहे. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना पोरकी आहेत. आरोग्यसेविका परिचर हे बाह्यरुग्ण तपासणी करीत असल्याचे दारुण चित्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे.
खासगी दवाखान्यातील उपचाराची पद्धत महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्ण सरकारी दवाखान्याकडे वळतात. जिल्ह्यात मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती अत्यंत बिकट आहे. ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. ही पदे दोन वर्षांपासून भरली नसल्याने आरोग्यसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एमबीबीएस डॉक्टरांना अपेक्षेपेक्षा कमी वेतन मिळत असल्याने हे डॉक्टर अनेक ठिकाणी सेवेत रुजू होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
आरोग्यसेविकेची सव्वादोनशे पदे रिक्त
डॉक्टरांनी सांगितलेले उपचार व रुग्णांवर निगराणी ठेवण्याचे काम आरोग्यसेविकेकडे असताना जिल्ह्यात तब्बल ही २२२ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका नसल्याने शासनाच्या विविध आरोग्यविषयक उपक्रमावर याचा परिणाम होत आहे. ग्रामीण भागात वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आरोग्य विभाग रुग्णांच्या जिवाशी खेळत असेल तर सर्वसामान्य रुग्णांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील शिसोदे यांनी केला.
प्रतिनियुक्तीत घोळ
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने ज्या उपकेंद्रात आरोग्य सेविका नाहीत, तेथे नजीकच्या उपकेंद्रातील तथा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका प्रतिनियुक्तीवर देण्याचे आदेश मिळतात. मात्र, प्रतिनियुक्ती केवळ एक महिन्यात बदलविण्यात येत असल्याचे अनेक प्रकार आरोग्य विभागात घडत आहे. आर्थिक देवाणघेवाणीचा फटका इमानेइतबारे आरोग्यसेवा देणाºया सेविकांना बसत असल्याची ओरड आहे.
उपचारासाठी आर्थिक दंड
परिसरातील नागरिकांना डॉक्टरांअभावी सेवा मिळत नाही. नागरिकांना उपचारासाठी आर्थिक दंड सोसत खासगी रुग्णालयाचे तोंड नाईलाजास्तव पहावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी तक्रारी देऊनही आश्वासनापलीकडे काहीच हाती न लागल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात गट 'अ'च्या ४० वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. नजीकच्या गट 'ब' संवर्गातील वैद्यकीय अधिकाºयांच्या सेवा त्यासाठी घेण्यात येत आहे. पदभरती घेण्यात आली. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- सुरेश असोले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती