मृत गाईच्या पोटात ४० किलो प्लास्टिक
By Admin | Published: June 22, 2017 12:12 AM2017-06-22T00:12:50+5:302017-06-22T00:12:50+5:30
शवविच्छेदनानंतर गाईच्या पोटातून सुमारे ३५ ते ४० किलो प्लास्टिकचा गोळा निघाला.
शवविच्छेदन अहवाल: जनावरांना मोकाट सोडू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शवविच्छेदनानंतर गाईच्या पोटातून सुमारे ३५ ते ४० किलो प्लास्टिकचा गोळा निघाला. बालाजी प्लॉट परिसरात ही गाय सोमवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आली असून यापूर्वीही तीन ते चार गायी दगावल्याच्या तक्रारी महापालिका पशुवैद्यकीय विभागाला प्राप्त झाल्या होत्या. गाईच्या मृत्यूबाबत गंभीर दखल घेत गोवंश जनावरांना मोकाट सोडू नका, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाने पशू पालकांना केले आहे.
बालाजी प्लॉट परिसरात मंगळवारी एक गाय मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच राजापेठचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेतील पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस पंचनामानंतर गायीच्या मृतदेहाला कंम्पोस्ट डेपोत नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे्र यांनी गाईचे शवविच्छेदन केले. त्यावेळी ही धक्कादायक बाब पुढे आली. गाईच्या पोटातून चक्क ३५ ते ४० किलोचा प्लास्टिकचा गोळा बाहेर निघाला. शहरात अनेक गोवंश जनावरे मोकाट फिरताना आढळून येतात. शहरवासी गार्इंना अन्नपदार्थ देताना ते अन्न प्लास्टिकवर टाकतात. ते पदार्थ खाताना गाय अन्न समजून प्लास्टिकच्या पिशव्या सुध्दा खातात. डॉक्टरांच्या मते, दैनंदिन आहारात गार्इंना ५ ते १० किलोचे अन्न लागते. अन्न खाऊन दिवसभर त्या रवंत करतात. अशावेळी दररोज थोडेफार प्लास्टिक गार्इंच्या खाण्यात आले, तर अन्नपदार्थ पचन झाल्यानंतर प्लास्टिक पोटातच साठून राहते. त्यामुळे पाच ते सहा महिन्यात गार्इंच्या पोटातील आतील भाग हा संपूर्ण प्लास्टिकने व्यापला जातो. प्रसंगी गाईची प्रकृती बिघडून तिचा मृत्यू होतो. त्यामुळे पशुपालकांनी गार्इंना मोकाट न सोडता त्यांच्या चाऱ्याची सोय करावी. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.