डेक्स-बेंच खरेदीत ४० लाखांची अनियमितता
By admin | Published: April 11, 2016 12:05 AM2016-04-11T00:05:18+5:302016-04-11T00:05:18+5:30
शहरातील उद्यान विकास आणि मुंबईच्या हायप्रोफाईल ‘स्टडी टूर’मध्ये लाखांचा घोळ घातला गेला. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील घोळ एवढ्यावरच थांबला नाही, ......
कंत्राटदाराला अभय : अभिलेखाशिवाय नोंदविला खर्च
प्रदीप भाकरे अमरावती
शहरातील उद्यान विकास आणि मुंबईच्या हायप्रोफाईल ‘स्टडी टूर’मध्ये लाखांचा घोळ घातला गेला. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील घोळ एवढ्यावरच थांबला नाही, तर शाळेसाठी करण्यात आलेल्या डेक्स-बेंच खरेदीत तब्बल ४० लाख रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याची बाब पुढे आली. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत समुदाय विकास समितीच्या स्तरावरून महापालिकेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळांना डेक्स-बेंच पुरवायचे होते. यासंबंधी ‘वनश्री मार्केटिंग’ या कंपनीशी करार करण्यात आला.
साहित्य खरेदीत घोळ
या संपूर्ण साहित्य खरेदीत घोळ घालण्यात आला. वनश्री मार्केटिंगसोबत झालेल्या करारनाम्याची मुळप्रत, दरकराराची मूळ प्रत, साठा नोंदवह्या तसेच ज्या शाळांना साहित्याचा पुरवठा करण्यात आला त्यांच्या साठा नोंदवह्या, पुरवठा दराच्या डिलिव्हरी मेमो वारंवार मागूनही उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे ३९ लक्ष ५० हजारांचा हा खर्च डेक्स-बेंच खरेदीवर झाला की नाही, हाच मूळ प्रश्न आहे.
लेखापरीक्षकांना ठेंगा
डेक्सबेंच खरेदीसंदर्भातील अभिलेखे (रेकॉर्ड) उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्य लेखपरीक्षकांनी १४ मार्च २०१४, २१ मार्च २०१४ व २८ मार्च २०१६ या अर्धशासकीय पत्रान्वये वारंवार कळविले. तथापि अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आली नाही. अभिलेखे उपलब्ध करून दिल्यास घोळ बाहेर येईल, अशी भीती असल्याने योजनाप्रमुखांकडून लेखापरीक्षकांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या.