४० हजार भक्तांनी घेतले अमरावती जिल्ह्यातल्या बहिरमबुवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:13 PM2017-12-28T14:13:42+5:302017-12-28T14:17:00+5:30
चांदूरबाजार तालुक्यातील सुप्रसिद्ध बहिरम यात्रा सुरू होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. यात्रा सुरू होताच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने नागरिकांनी यात्रेत प्रचंड गर्दी केली होती. रविवारी ४० हजार भाविकांनी बहिरमबुवांचे दर्शन घेतले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील सुप्रसिद्ध बहिरम यात्रा सुरू होऊन एक आठवड्याचा कालावधी झाला आहे. यात्रा सुरू होताच भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने नागरिकांनी यात्रेत प्रचंड गर्दी केली होती. रविवारी ४० हजार भाविकांनी बहिरमबुवांचे दर्शन घेतले.
महिनाभर चालणारी ही विदर्भातील सर्वात मोठी यात्रा आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील कुलदैवत असणारे भाविकही या यात्रेत आवर्जून हजेरी लावतात. मध्यंतरीचा काही काळ सोडल्यास अलिकडे बहिरम यात्रेतील गर्दी ओसंडून वाहू लागल्याचे चित्र आहे. पूर्वी तमाशा या यात्रेचे महत्त्वाचे आकर्षण होते. परंतु स्थानिक जनप्रतिनिधींच्या पुढाकाराने तमाशेबंद होऊन यात्रेत समाजप्रबोधनपर कार्यक्रमाला सुरूवात झाली. आता मात्र यात्रेला वेगळाच रंग चढला आहे. यात्रेत शेतकऱ्यांसाठी शेतीउपयोगी साहित्य विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.
सगळीकडे उभारलेल्या राहुट्या, निसर्गरम्य वातावरण व त्यातच रोडगे व मटणाच्या हंडीची पंगत हे बहिरम यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. सलग तीन दिवस असलेल्या सुट्यांमुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शहरी भागांत राहणारी मंडळी आपल्या परिवारासह बहिरम यात्रेत आनंद लुटताना दिसत होते. २० डिसेंबरपासून सुरू झालेली ही यात्रा जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चालते. मंदिराचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी यांनी मंदिराची महाआरती करून यात्रेला सुरूवात केली. गुलाबी थंडीत पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवाच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी अलोट गर्दी उसळते.
तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी या यात्रेला शासकीय रुप आणले होते. मात्र, सत्तापालट होताच त्याचे पडसाद या यात्रेवर उमटले. मात्र, तरीही भाविकांची श्रद्धा कमी न होता दरवर्षी उपस्थितांचा उच्चांक यात्रा गाठतच आहे. आमदार बच्चू कडू यांच्यातर्फे शासन आपल्या दारी सारख्या लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे या यात्रेत महिनाभर यात्रेकरूंना आनंदाची पर्वणीच लाभते.
शामियानांनी झाकले बहिरम
बहिरम यात्रेच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने या यात्रेत चारही बाजूंनी झाकलेल्या राहुट्या उभारण्यात येतात. त्यामुळे थंडीचा परिणाम जाणवत नाही. तसेच या राहुटीत गालीचे, गादी तसेच सुबक अशी वऱ्हाडी बैठक तयार केल्या जातात. या राहुटीच्या बाहेर उघड्यावर शेकोटीची व्यवस्थादेखील केलेली असते. त्यामुळे येथे राहुटीत रात्र काढण्याची मजा काही औरच असते.