स्वच्छ अमरावती जिल्ह्यासाठी ४० हजार गृहभेटी अभियान
By admin | Published: August 22, 2016 12:04 AM2016-08-22T00:04:26+5:302016-08-22T00:04:26+5:30
जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हाभरात सोमवार २२ आॅगस्टपासून सुमारे ४० हजार गुहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे.
कार्यशाळा : सोमवारपासून राबविणार अभियान
अमरावती : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हाभरात सोमवार २२ आॅगस्टपासून सुमारे ४० हजार गुहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे. याविषयावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, सीईओ के.एच. कुलकर्णी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय इंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे आदींच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)या राष्ट्रीय कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. सन २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यांतर्गत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतींमधील वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत राज्यव्यापी गृहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावनिहाय गृहभेटी घेतल्या जाणार आहेत. यात संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग भेटीत राहणार आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांची भेट घेऊन कुटुंब प्रमुखाला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. या अभियानाच्या कालावधीत सुमारे ४० हजार गृहभेटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हाभरातील जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त करावे, नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांनी केले आहे. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेला प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे यांनी मोलाचे मागदर्शन केले. याप्रसंगी खातेप्रमुख, पदाधिकारी गटविकास अधिकारी नोडल आॅफिसर बीआरसी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे, बर्डे, दर्शना गौतम, धनंजय तिरमारे, नीलेश नागपूरकर, बाळासाहेब बोर्डे, अजिंक्य काळे, भरत वानखडे आदींचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)