४०० शेतकऱ्यांची ‘महाबीज’कडून फसवणूक
By admin | Published: November 22, 2014 12:00 AM2014-11-22T00:00:41+5:302014-11-22T00:00:41+5:30
पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले.
गजानन मोहोड अमरावती
पूर्णानगर परिसरातील ४०० शेतकऱ्यांनी महाबीजचे ३३५ जातींचे वाण पेरले, हे बियाणे उगवलेच नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पाहणी झाली, अहवालात बियाणे वांझोटे निघाले. मात्र, महाबीजने येथील एकाही शेतकऱ्याला बियाणे किंवा रोख स्वरुपात परतावा दिला नाही. त्यामुळे ‘महाबीज’ने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
खरीप-२०१४ च्या हंगामात सोयाबीन उगवले नसल्याच्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. तक्रार निवारण पथकाव्दारा या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी २७० नमुन्यांमध्ये उगवणशक्तीचा अभाव असल्याचा अहवाल आहे. पूर्णानगर, वातोंडा, येलकी, अंचलवाडी, मिर्झापूर, वाकी, सावलपूर, उमरटेक गावातील शेतकऱ्यांनी पूर्णानगर येथील कृषीसेवा केंद्रामधून महाबीजचे बियाणे खरेदी केले होते. परंतु ते बियाणे वांझोटे निघाले. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्यास त्यासाठी महाबीज जबाबदार असेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन हजार एकरामध्ये नुकसान
अमरावती : हे बियाणे वांझोटे निघाल्याचे शेतकऱ्यांचा घात झाला. पथक पाहनीला येणार म्हणून कित्येक दिवस शेत पेरणीविना राहिले. कपनीव्दारा बियाणे देण्यात येईल. या आशेवर पाणी फेरल्या गेले. महाबीजसह ईतर कंपन्यांची बियाणे किंवा रोख स्वरुपात देण्यात आलेला नाही. दुपार पेरणीला बियाणे नाही व उशीर झाल्यामुळे या शेतकऱ्यांची किमान २ हजारावर एकर क्षेत्रात खरीप पिकाचे नुकसान झाले. वांझोट्या बियाण्यांची विक्री करणाऱ्या महाबीजसह ईतर कंपन्यावर कारवाई करावी, नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
२८ शेतकऱ्यांना परतावा,
५० शेतकऱ्यांना भरपाई
खरीप हंगाम २०१४ मध्ये बियाणे उगवन न झालेल्या ४९८ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्यात. या प्रकरणांची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीव्दारा तपासणी करण्यात आली. यामध्ये २८ शेतकऱ्यांना ४६ क्विंटल बियाणे ५० शेतकऱ्यांना ७ लाख ३५ हजारांची मदत देण्यात आली. सर्वाधिक नुकसान झालेल्या पूर्णानगर परिसरातील एकाही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
परवाने रद्द झालेले कृषी केंद्र सुरूच
सोयाबीन बियाण्यांची उगवनशक्ती नसलेले बियाणे विकण्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्र व यश कृषी सेवा केंद्र यांचे बियाणे विक्रीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. मात्र हे दोन्ही दुकान सुरू असल्याचा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. याशिवाय कृषी विभागाशी संपर्क साधला असता, त्या दुकानदारांचे किटकनाशक व खते विक्रीचे परवाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार याच विक्रेत्यांनी परिवारातील अन्य व्यक्तिंच्या नावे परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
२१ प्रकरणात केसेस दाखल
उगवनशक्ती नसलेले बियाण्यांच्या तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला कंपनीकडून मिळावा असा, प्रयत्न कृषी विभाग करतो, असे कृषी विकास अधिकारी वरुन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)