अमरावती जिल्ह्यातील कुहृयाच्या बालाजी नवरात्र उत्सवाला ४०० वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:05 AM2018-10-13T11:05:40+5:302018-10-13T11:06:41+5:30
तिरुपती बालाजीचे प्रतीक असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील श्री लहान बालाजी देवस्थान व मोठे बालाजी देवस्थानात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
रितेश नारळे/
अमरावती : तिरुपती बालाजीचे प्रतीक असलेले तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील श्री लहान बालाजी देवस्थान व मोठे बालाजी देवस्थानात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या दहा दिवसांत रोज रात्री बालाजीच्या विविध वाहनांची गावातून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा येथे ४०० वर्षांपासून जपलेली आहे.
सुमारे ४०० वर्षांपूर्वी तत्कालीन वऱ्हाड प्रांतात निजामशाहीमध्ये कुऱ्हा येथील मंदिराची उभारणी झाली. तेलंगणातून आलेल्या तेलंगी ब्राम्हणांनी तिरुपतीवरून आणलेल्या पंचधातूच्या मूर्ती कुऱ्हा येथील गोविंद सोनार यांच्याकडे ठेवल्या. नंतर त्यांच्या घरातच लहान बालाजी देवस्थान अस्तित्वात आले. निजामशाही संपुष्टात आल्यानंतर भोसले घराण्याचे पंतसचिव आप्पाजी देशमुख यांना हे देवस्थान सोपविण्यात आले. तेव्हापासून देशमुख घराण्याचे वंशजच देवालयाचा कारभार सांभाळत आहेत. मंदिरात बालाजीची सुंदर प्राचीन मूर्ती मधोमध उभी आहे. सोबतच पुरातन विठ्ठल रुख्मिणी मूर्ती आणि गजानन महाराजदेखील आहेत.
या उत्सवात बालाजीच्या वाहनांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. नाग, चक्र, मोर, वाघ, गरुड, हनुमान, पाळणा, घोडा, पालखी, हत्ती अशा क्रमाने वाहनांची मिरवणूक वारकरी मंडळी रात्री ९ ते १०.३० अशी काढतात. महिला वाहनांची पूजाअर्चा करतात आणि साखरपोह्याचा प्रसाद देतात. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पालखीचा मान असतो. तिचे सीमोल्लंघन करून गावात परत आणतात. गावातील लोक प्रथम पालखीला सोन्याची पाने वाहतात त्यानंतर एकमेकांना सोने देतात. दसऱ्हाच्या दुसऱ्हा दिवशी समारोपाला सकाळी हत्तीचे वाहन निघते. यावर बालाजी विराजमान होऊन राजाच्या रूपात लोकांच्या घरापर्यंत येत असल्यामुळे गावातील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
प्राचीन काळी बालाजी मंदिर दगडी होते. देवस्थानची संपत्ती व लोकवर्गणीतून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. पुरातन असूनही शासनाने या मंदिराला हेरिटेजचा दर्जा दिला नाही. लोकवर्गणीतून कारभार चालतो. मोठ्या बालाजी देवस्थानचे अध्यक्ष दिलीप डांगे व श्री लहान बालाजी मंदिराचा कारभार देशमुखांचे वंशज संस्थांचे अध्यक्ष विजय देशमुख, व विश्वस्त सुधाकर देशमुख, सुरेश मुळे, दत्तुजी भुरले, रमेश देशमुख, प्रवीण देशमुख सांभाळत आहेत.
बालाजी नवरात्र उत्सव दहा दिवस चालतो. इतकी प्राचीन परंपरा राबविणारे हे एकमेव देवस्थान आहे. हत्ती वाहनाच्या दिवशी बालाजीचे दर्शन घेण्यासाठी बाहेरगावाहून मंडळी येथे येतात.
विजय देशमुख, अध्यक्ष, लहान बालाजी देवस्थान, कुऱ्हा.