अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी; दोन हजारांवर नागरिक स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 09:40 PM2022-08-08T21:40:18+5:302022-08-08T21:40:45+5:30
Amravati News नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे.
अमरावती : दहा दिवसांची उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. २४ तासात वरुड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीनाल्यांना आलेला पुरामुळे वरुड तालुक्यातील ४०८ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या बाधित कुटुंबांतील किमान दोन हजार व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेला व त्याचा शोध पथक घेत आहेत. याशिवाय लहान-मोठ्या १५ जनावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्ह्यात सार्वत्रिक ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये वरूड तालुक्यात सर्वाधिक ९२ मि.मी. पाऊस झाला आहे. या तालुक्यातील शेंदूरजना घाट मंडळात ११०.२५ मि.मी., पुसला ११०.२५, वरूड ९६.७५, बेनोडा ७५ व वाठोडा १००.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी लोणी सर्कलमध्ये व त्यापूर्वी २५ जुलै रोजी वरूड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. या तालुक्यात सरासरीच्या १५२ टक्के पाऊस झालेला आहे.
संततधार पावसामुळे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा येवा वाढल्याने पाचव्यांचा १३ ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. विसर्ग यावेळी जास्त असल्याने नदीनाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहे. याशिवाय १४०० हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
४८० घरांची पडझड
अतिवृष्टीमुळे वरुड तालुक्यात ३४९ घरांची व मोर्शी तालुक्यात ३० घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय वरुड तालुक्यात ८१ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेले आहे. नुकसानीचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी पंचनामे करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
वर्धा ओव्हरफ्लो; अमरावती - वर्धा राज्यमार्ग बंद
पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आलेला आहे व कौंडण्यपूर येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने अमरावती व वर्धा या राज्य महामार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. याशिवाय नालेदेखील दुथडी भरून वाहत आहेत.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ऊर्ध्व वर्धा, नागठाणा, पाक नदी धरण, सपण, पूर्णा, निम्न वर्धा आदी प्रकल्पांमध्ये अतिवृष्टीमुळे येवा वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले व विसर्ग सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.