महापालिकेचे ४२ विद्यार्थी ठरले ‘स्कॉलर’; शिष्यवृत्ती परिक्षेत निर्भेळ यश, आयुक्तांकडून कौतुक
By प्रदीप भाकरे | Published: July 23, 2023 01:10 PM2023-07-23T13:10:19+5:302023-07-23T13:11:28+5:30
भाजीबाजारची शाळा गाठून महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्या स्कॉलर विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
अमरावती: खाजगी शाळांच्या तुलनेत महानगरपालिकेच्या शाळा कुठेही कमी नाहीत, याचा प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. महानगरपालिकेच्या भाजीबाजारस्थित हिंदी शाळेच्या ४२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले. यंदा झालेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शहरातून ७२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. त्यापैकी ४२ विद्यार्थी हे भाजी बाजार शाळेतील आहेत. यात इयत्ता पाचवीचे १९, तर इयत्ता आठवीचे २३ विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीमध्ये झळकले.
शनिवारी भाजीबाजारची शाळा गाठून महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्या स्कॉलर विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शाळा निरीक्षक उमेश गोदे, वाहिद खान उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या भिंतींना स्वहस्ते रंगरंगोटी करून व चित्रे काढून बोलके केले. विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी देखील काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी मुख्याध्यापक गोपाल कांबळे, शिक्षक एहफाज उल्ला खान, प्रफुल्ल करमरकर, आशिष कोपूल, रुही शुक्ला व सरिता ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
शाळेची पटसंख्या ६९२
विशेष म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असणाऱ्या भाजीबाजार शाळेची एकूण पटसंख्या तब्बल ६९२ इतकी उच्चांकी आहे. मागील वर्षापासून तेथे इयत्ता नववी व दहावीचे वर्ग देखील सुरू झाले आहेत. गतवर्षी काठमांडू येथे झालेल्या १४ वर्षांखालील वयोगटाच्या शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये भाजी बाजार शाळेच्या संघाने अंतिम विजेता म्हणून पदक प्राप्त केले. दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील खो-खो स्पर्धेमध्ये सुद्धा तेथील मुलांचा संघ सहभागी झाला.