अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तब्बल ४३५ किलो गांजा जप्त, चार आरोपी ताब्यात
By गणेश वासनिक | Published: September 3, 2022 05:47 PM2022-09-03T17:47:17+5:302022-09-03T17:49:04+5:30
मालखेड गार्डन फाट्याजवळ पकडला ट्रक, पेट्रोलिंग कार
चांदूर रेल्वे (अमरावती) : जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय पथकाने शनिवारी सकाळी ट्रकमधून वाहून नेला जात असलेला तब्बल ५२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या ट्रकला मागे-पुढे पेट्रोलिंग करणारी दोन वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली.
पेट्रोलिंग करीत असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गार्डन फाट्याजवळ ही कारवाई केली. यात एकूण ४३५ किलो गांजा पथकाने पकडला. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. वृषभ मोहन पोहोकार (२५, रा . रिद्धपूर, ता . मोर्शी), विक्की बस्तीलाल युवनाते (२०, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार), शेख अरबाज शेख इलियास, (१९, रा. आझादनगर, अमरावती), शेख तौसिफ शेख लतीफ, (१९, रा. रतनगंज, खुर्शीदपुरा, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
ते आंध्र प्रदेशातून पांढरकवडा-यवतमाळ-बाभूळगाव-चांदूर रेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रकमधून गांजाची वाहतूक करीत होते. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी नाकाबंदी करून पथकामार्फत वाहन थांबविले. यावेळी सीजी १२ बीई ५७६१ क्रमांकाच्या एका ट्रकमध्ये रिकाम्या प्लास्टिक क्रेटखालून ५५ खाकी ठोकळे व पोत्यांमधून ५२ लाख २० हजार ६०० रुपयांचा गांजा होता. या ट्रकसह एमएच १२ डीएच ५७५७ आणि एमएच ४९ एटी ०४४८ क्रमांकाच्या दोन कार ताब्यात घेतल्या. एकूण ७४ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो चार आरोपींसमवेत चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक विलास कुळकर्णी करीत आहेत.