४४ प्रवासी मृत्यूच्या दारात पण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वाचविले प्राण
By गणेश वासनिक | Published: December 30, 2023 05:18 PM2023-12-30T17:18:17+5:302023-12-30T17:18:42+5:30
मध्य रेल्वेत ‘मिशन जीवन रक्षक’ मोहीम, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ दरम्यानच्या विविध घटना
अमरावती : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्मचारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच आघाडीवर आहेत. २४ तास जागरूक हे त्यांच्या कर्तव्याची उद्दिष्टे आहेत. मात्र एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ४४ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.
मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवान ‘मिशन जीवन रक्षक’ या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रवाशांच्या मदतीला धावून जातात. आरपीएफने ज्या प्रवाशांचे प्राण वाचविले, त्या घटनांचे दृष्य वृत्तपत्र वा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आणि विविध समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या ४४ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात जीव वाचविणाच्या एकूण २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५, पुणे विभागात ४, तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात दोन जीव वाचविण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळविणे आदी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्याप्रमाणे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित करून असतात.
धावत्या ट्रेनमध्ये चढणे, उतरणे अथवा आत्महत्येचा प्रयत्नातून जीव वाचविले
रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने विविध प्रकरणांमध्ये प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. यात प्रवासी काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात. काहीवेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करतानादेखील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी लोकांचे जीव वाचविले आहे. शेवटी एखाद्याचा जीव वाचविण्याच्या या कृतीचा रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांप्रती आनंद आणि कृतज्ञता वाढवतो.
ट्रेन सुटण्याच्या वेळापत्रकाच्या अगोदर स्थानकावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरू नये व जीव धोक्यात घालू नये. रेल्वे प्रवासाचे नियोजन करावे.
शिवाजी मानसपुरे,
जनसंपर्क अधिकारी, भुसावळ मध्य रेल्वे