४४ शिक्षकांची वेतनवाढ रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:32 PM2018-07-23T23:32:21+5:302018-07-23T23:32:43+5:30
जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरणाऱ्या ६० पैकी ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. याशिवाय या शिक्षकांना गैरआदिवासी भागातून मेळघाटात पदस्थापना देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी १८ जुलै रोजी जारी केले. या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरणाऱ्या ६० पैकी ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. याशिवाय या शिक्षकांना गैरआदिवासी भागातून मेळघाटात पदस्थापना देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी १८ जुलै रोजी जारी केले. या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्यस्तरावरून पहिल्यांदाच जि.प. शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या. मात्र, या बदली प्रक्रियेत आॅनलाइन अर्ज भरतांना काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून गैरआदिवासी भागात सोईच्या ठिकाणी पदस्थापना मिळविली. यासंदर्भात अन्यायग्रस्त शिक्षकांनी सीईओंकडे तक्रारी केल्या. सीईओंनी चुकीची माहिती भरणाºया ६० शिक्षकांची पहिल्या टप्यात जिल्हा परिषदेत सुनावणी घेतली. ४४ शिक्षक दोषी आढळल्याने त्यांची कायमस्वरूपी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. याशिवाय गैरआदिवासी भागातील नियुक्ती रद्द करून त्यांना बदलीवर मेळघाटात पाठविण्याबाबतचे आदेश त्यांनी काढले. या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. या शिक्षकांना तातडीने मेळघाटात रूजूृ होण्याचे आदेश दिले असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांनी सांगितले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
झेडपी सदस्यांनी दिला होता उपोषणाचा इशारा
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत मेळघाटातील १६ शाळांवर शिक्षक नियुक्त केले नसल्याने या शाळा बंद आहेत. यासह मेळघाटात ज्या शाळांवर शिक्षक नाहीत, तेथे शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, याबाबत १२ जुलै रोजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार, दयाराम काळे, माजी सदस्य श्रीपाल पाल आदींनी सीईओंना निवेदत देत २४ जुलैपासून झेडपीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, यासंदर्भात सीईओंनी मेळघाटातील रिक्त पदांवर शिक्षक नियुक्त केल्याचे लेखी पत्र दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेतल्याचे सदस्य महेंद्र गैलवार यांनी सांगितले.
ज्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरली, अशा ४४ शिक्षकांची कायमस्वरूपी एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. त्यांची मेळघाटात बदली करण्याचे आदेश बजावले आहेत.
- मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी