४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मंत्रालयात

By Admin | Published: June 26, 2014 11:01 PM2014-06-26T23:01:05+5:302014-06-26T23:01:05+5:30

अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या

44.44 crores of water supply scheme | ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मंत्रालयात

४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मंत्रालयात

googlenewsNext

अमरावती : अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या शासन दरबारी पोहचविली आहे. या गंभीर प्रश्नावर मंत्रालयात विशेष बैठक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रधान सचिव राजेशकुमार यांना पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी महानगरात पाणीपुरवठयासंदर्भात उद्भवलेली समस्या विशद केली आहे. काही महिन्यापूर्वी माजी आ. संजय बंड यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, ही मागणी पोटतिडकीने मांडली होती. निवेदनाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना लवकर मंजूर करुन जनतेला दिलासा देण्याची मागणी केली आहे. २८ एप्रिल २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नांबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठ स्तरावर हालचाली नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींनीसुध्दा या विषयावर शासनाकडे पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येते.
नगरोत्थानतंर्गत ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात असल्याने जीवन प्राधिकरणाला पाणीपुरवाठा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही भागात अवेळी पाणी पुरवठा होत असल्याने जनतेच्या रोषाचा सामनादेखील करावा लागत आहे. हल्ली पावसाळा सुरु झाला असला तरी पाऊस बरसला नसल्याने पाण्याचा वापर हा उन्हाळ्याप्रमाणेच सुरु आहे.
पाण्याची मागणी वाढली असून पाणी पुरवठ्यासाठी लागणारी यंत्रणा अपुरी असल्याने पाणी पुरवठा कसा करावा, असा प्रश्न जीवन प्राधिकरण विभागापुढे निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरणकडे पाणी भरपूर आहे; मात्र पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारण्यासाठी निधीची गरज आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र पाठवून नगरोत्थानअंतर्गत ४४.४४ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 44.44 crores of water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.