रखडलेल्या प्रकल्पांवर रेल्वेमंत्र्यांशी ४५ मिनिटे चर्चा
By admin | Published: April 18, 2015 12:00 AM2015-04-18T00:00:54+5:302015-04-18T00:00:54+5:30
जिल्ह्यात रखडलेले रेल्वेचे विविध प्रकल्पांचे काम पूर्णत्वास यावे यासाठी आ. रवी राणा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची बुधवारी भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली.
रवी राणांचा पुढाकार : दिल्ली येथील रेल्वे भवनात बैठक
अमरावती : जिल्ह्यात रखडलेले रेल्वेचे विविध प्रकल्पांचे काम पूर्णत्वास यावे यासाठी आ. रवी राणा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची बुधवारी भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली. यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी रखडलेल्या प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याची हमी दिली.
नवी दिल्ली येथील रेल्वे भवनात आ. राणा यांच्या पुढाकाराने रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांचे प्रश्न सुटावे, यासाठी थेट रेल्वेमंत्री प्रभू यांना साकडे घातले. यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी जिल्ह्यात रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रंबधक सुनीलकुमार सूद, प्रधान मुख्य अभियंता कुलशस्त्र, भुसावळ विभागाचे प्रबंधक सुधीर गुप्ता, ओ.पी. सिंग, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक चंद्राकार, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल, संजीव कुमार आदींना दिले. दरम्यान बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यात प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेण्यात यावे. अचलपूर- मूर्तिजापूर- यवतमाळ शकुंतला ही ब्रॉडगेजमध्ये सुरु करावी. बडनेरा येथील रेल्वे पुलाच्या चौपदरीकरणासाठी ३३ कोटी रुपये उपलब्ध करुन द्यावेत. बडनेरा रेल्वे स्थानकावर एक अतिरिक्त प्लॅटफार्मची निर्मिती करण्यात यावी. राजापेठ रेल्वे उडड्डाणपुलाच्या कामांना गती देण्यात यावी. मुंबई-दिल्लीकडे ये-जा करण्यासाठी नवीन गाड्या सुरु करण्यात याव्यात. नागपूर- मुंबई दुरंतो या गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. नवाथे अंडरपाथचे काम सुरु करण्यात यावे. अमरावती-सुरत एक्स्प्रेस ही आठवड्यातून पाच दिवस चालविण्यात यावी आदी मागण्यांची यादी रेल्वेमंत्र्यांच्या पुढ्यात ठेवली.