अमरावतीत ४५० बंडल नायलॉन मांजा जप्त, नागपुरी गेट पाेलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 11:42 AM2022-01-11T11:42:50+5:302022-01-11T11:48:20+5:30
अमरावतीत गुन्हे शाखेने दोन ठिकाणांवर छापे टाकत तब्बल ४५० बंडल प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला.
अमरावती : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन ठिकाणांहून तब्बल ४५० बंडल प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्माननगर व छायानगर येथे १० जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.
मकर संक्रांतींच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजी केली जात आहे. त्यासाठी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी अधिनस्थ यंत्रणेला त्याबाबत कडक निर्देश दिले. बरहुकूम उस्माननगर येथील पतंगाच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. यावेळी शेख रफीक शेख लाल (४४, नालसाबपुरा) हा तेथे नायलॉन मांजाची साठवणूक व विक्री करताना आढळून आला. तेथून १९ हजार ९०० रुपये किमतीचा ३९८ नग बंडल, चक्री, चार मोठे बंडल असा एकूण २७ हजार ६०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई छायानगर येथील सै. एजाज सै. राका (२८) याच्या लकी जनरल स्टोअर्समध्ये करण्यात आली. त्याच्याकडून १४ हजार ४०० रुपये किमतीचा ४८ बंडल नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक पंकज चक्रे, उपनिरीक्षक राजकिरण येवले, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, दिनेश नांदे, विशाल वाकपांजर, राजेश राठोड, नीलेश जुनघरे व गजानन ढेवले यांनी केली.