४६ युनिटचे बिल ९५,२४० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:34 PM2018-12-14T22:34:50+5:302018-12-14T22:35:10+5:30
मीटर रीडिंंग घेणाऱ्या खासगी संस्थांकडून घोळ समोर येत आहे. ममदापूर येथील एका जणाला ४६ युनिटचे देयक तब्बल ९५ हजार २४० रुपये आल्याने या अनागोंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
सूरज दहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : मीटर रीडिंंग घेणाऱ्या खासगी संस्थांकडून घोळ समोर येत आहे. ममदापूर येथील एका जणाला ४६ युनिटचे देयक तब्बल ९५ हजार २४० रुपये आल्याने या अनागोंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
तालुक्यातील ममदापूर येथील बाळकृष्ण रामभाऊ शिरपूरकर यांना तर ४६ युनिटचे तब्बल ९५ हजार २४० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. वीज बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे . तिवसा येथील प्रकाश भाऊराव बोके यांना घरगुती विज बिल ५५,१०० रुपये दिले गेले. यासंदर्भात त्यांनी महावितरणकडे तक्रारी केल्या. मात्र, महावितरणच्या तिवसा कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी वीज बिल दुरुस्तीसाठी अर्ज करूनही मीटर बदलून दिले नाही. त्यांच्या रीडिंगमध्ये मोठी तफावत आहे. अखेर त्यांनी ग्राहक मंचात तक्रार करून न्यायाची मागणी केली. यांसह तालुक्यात अनेक ग्राहकांच्या बिलात प्रचंड घोळ असून, मीटर रीडिंगमध्ये चुका आहेत. त्यामुळे ग्राहकांचा रोष वाढला आहे.
मीटर रीडिंग घेणाºया संस्थेने केलेल्या चुकीचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे संबंधित वीजग्राहकांना या चुकीच्या वीज बिलांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणने मीटर रीडिंग घेणाºया कंत्राटदारावर कारवाई करून रीडिंग योग्य पद्धतीने घेण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. यासंदर्भात तिवसा येथील महावितरण कंपनीच्या अभियंत्याशी संपर्क होऊ शकला नाही.