४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:52+5:302021-07-22T04:09:52+5:30

अमरावती/ संदीप मानकर जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत ...

475 farmers' agricultural connections pending | ४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

Next

अमरावती/ संदीप मानकर

जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत त्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

एचव्हीडीएस (उच्चदाब वितरण प्रणाली) अंतर्गत ३१ मार्च २०१८ पूर्वी ३ हजार ९०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरीता अर्ज केले. त्यापैकी आतापर्यंत ३४२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ४७५ शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज जोडणी न मिळाल्याने ते संबंधित महावितरण कार्यालयात येरझारा घालत आहेत. पैसे भरूनही लाभ मिळत नसेल, तर शेती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ज्या वीज जोडणीचे अंतर ६०० मीटरपर्यंत आहे, अशा ठिकाणीच महावितरणाला अडचण निर्माण होत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतात उच्चदाब वाहिनी टाकणे तसेच विद्युत पोल व ट्रान्सफाॅर्मर लावण्यास अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

एजी २०-२० पॉलिसी

महावितरणच्या एजी २०-२० पॉलिसी अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर २७०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले. त्यापैकी ३० मीटरच्या आता लघुदाब वाहिनी व ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध आहे. अशा ८०० ग्राहकांना आतापर्यंत वीज जोडणीचा लाभ मिळाला. मात्र, ज्यांचे लघुदाब वाहिनी अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे, अशा १९०० ग्राहकांना अद्यापही कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब महावितरणच्या आकडेवारीतून समोर आली.

बॉक्स:

ग्राहकांनी खर्च केला तर वीज जोडणीचा लाभ

लघुदाब वाहिनीचे अंतर जर ट्रान्सफाॅर्मरपासून २०० मीटर असेल व ज्या ग्राहकांनी याचा खर्च जर स्वत: केला, तर आतापर्यंत ३० ग्राहकांना याचा लाभ तातडीने देण्यात आला. एक कनेक्शनला साधारणत: ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र, ज्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही, अशा ग्राहकांना उच्चदाब वाहिनीवरून कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, याकरिता महावितरणने मुख्य कार्यालयाला १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची तरतूद झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

कोट

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्यांनी पैसे भरले, असे फक्त ४७५ ग्राहक राहिले आहेत. पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. ती कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. १ एप्रिलनंतर ज्यांचे कनेक्शन ३० मीटरच्या आता आहे, अशा ८०० जणांना सात दिवसांच्या आत महावितरणने कनेक्शन दिले आहेत.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण

Web Title: 475 farmers' agricultural connections pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.