४७८ पोलिसांच्या आरोग्याची तपासणी
By admin | Published: March 6, 2016 12:04 AM2016-03-06T00:04:47+5:302016-03-06T00:04:47+5:30
वसंत हॉल येथे शुक्रवारी आयोजित आरोग्य शिबिरात पोलीस विभागातील ४७८ पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
अमरावती : वसंत हॉल येथे शुक्रवारी आयोजित आरोग्य शिबिरात पोलीस विभागातील ४७८ पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम, नितीन पवार, सहायक पोलीस आयुक्त रियाजुद्दीन देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील उपस्थित होते.
काही दिवसांमध्ये पोलीस विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष वेधले आहे. ४० वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात इर्विनमधील डॉक्टर व परिचारिकामार्फत पोलिसांच्या विविध चाचण्या करण्यात आल्यात. तसेच खासगी क्षेत्रातील भागवत यांच्यामार्फत पोलिसांच्या काही चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे १५० पोलीस कर्मचाऱ्यांचे ईसीजी, ३५० कर्मचाऱ्यांची शुगर तपासणी व २४७ जणांची लिपीट प्रोफाईलची तपासणी करण्यात आली आहे. पुढेही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या आरोग्य शिबीराला पोलिसांनी प्रतिसाद देऊन स्वत:च्या आरोग्यांची तपासणी करून घेतली. (प्रतिनिधी)